आयुर्वेदिक औषधी देण्याच्या बहाण्याने अर्धनग्न फोटो काढून ब्लॅकमेलिंग; महिलेसह तिघे ताब्यात

By विजय मुंडे  | Updated: April 16, 2025 14:56 IST2025-04-16T14:56:32+5:302025-04-16T14:56:52+5:30

औषधविक्रेत्या महिलेसह तिघे ताब्यात; चार लाख, ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

Blackmailed by taking half-naked photos on the pretext of giving Ayurvedic medicine; Three including a woman detained | आयुर्वेदिक औषधी देण्याच्या बहाण्याने अर्धनग्न फोटो काढून ब्लॅकमेलिंग; महिलेसह तिघे ताब्यात

आयुर्वेदिक औषधी देण्याच्या बहाण्याने अर्धनग्न फोटो काढून ब्लॅकमेलिंग; महिलेसह तिघे ताब्यात

जालना : एका व्यक्तीला लिव्हरचे आयुर्वेदिक औषध देण्याच्या बहान्याने घरी बोलावून अर्धनग्न फोटो काढत साडेतीन लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीतील दोन महिला आणि एका पुरूषास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून चार लाख ४० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी १५ एप्रिल राेजी दुपारी जालना शहरातील अंबड चौफुली भागात करण्यात आली.

जालना शहरातील समर्थनगर भागात राहणारे जगन्नाथ पांडुरंग नागरे (वय-५६) यांनी १५ दिवसांपूर्वी एका महिलेला अंबड चौफुली ते पाण्याच्या टाकीदरम्यान लिफ्ट दिली होती. त्यावेळी त्या महिलेने आपण आयुर्वैदिक औषधी विक्री करीत असल्याचे सांगितले. नागरे यांनी लिव्हरचे औषध देण्याबाबत त्या महिलेस सांगितले. महिलेने त्यांना १४ एप्रिल रोजी अंबड येथील घरी बोलावून घेतले. परंतु, तेथे असलेल्या एका इसमाने आणि महिलेने नागरे यांना कपडे काढण्यास सांगत अर्धनग्न फोटो काढले आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत साडेतीन लाख रूपयांची मागणी केली. त्यानंतर नागरे यांनी त्या महिलेच्या फोन पेवर एक लाख रूपये पाठविले आणि अडीच लाखांचा चेक दिला. परंतु, तो न वटल्याने त्या महिलेने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली.

पैसे घेण्यासाठी ती महिला मंगळवारी १५ एप्रिल रोजी जालना शहरातील अंबड चौफुली भागात येणार होती. त्यावेळी एलसीबीच्या पथकाने सापळा रचून गोकर्ण पंडितराव जोशी (रा.शिवाजीनगर अंबड) व इतर दोन महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अडीच लाखांचा चेक, २० हजारांची अंगठी, दोन मोबाईल, एक कार असा एकूण ४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तिन्ही आरोपींना अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीची अप्पर पोलिस अधीक्षकांकडे धाव
महिलेकडून फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली जात असल्याने नागरे यांनी अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्याकडे धाव घेत हकिकत सांगितली. त्यानंतर नोपाणी यांनी एलसीबीच्या टिमला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Blackmailed by taking half-naked photos on the pretext of giving Ayurvedic medicine; Three including a woman detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.