पुलावरून दुचाकी कोसळली; अपघातात दोघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 18:49 IST2020-10-24T18:48:49+5:302020-10-24T18:49:36+5:30
जामखेड- बदनापूर रस्त्यावर पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्ता करण्यात आला आहे.

पुलावरून दुचाकी कोसळली; अपघातात दोघे गंभीर जखमी
जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड - बदनापूर रस्त्यावर असलेल्या पुलावरून दुचाकी खाली कोसळ्याने शुक्रवारी रात्री अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. बाबासाहेब भाऊलाल सूर्यवंशी (३०) व रामेश्वर सांडू म्हस्के (३२ दोघे रा. मंगरूळ, ता. जि. औरंगाबाद) अशी जखमीची नावे असून त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरु आहेत.
जामखेड- बदनापूर रस्त्यावर पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्ता करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री पाचोड येथून बाबासाहेब सूर्यवंशी व रामेश्वर म्हस्के हे दोघेजण दुचाकी क्रमांक (एमएच २० सीझेड ६१४९) ने जामखेडकडे जात होते. जामखेड -बदनापूर रस्त्यावर असलेल्या पुलाजवळ आल्यावर रस्त्याचा अंदाज न आल्याने दोघेही दुचाकीसह नाल्यात पडले. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांना नाल्यात दुचाकी पडल्याचे दिसले त्या दोघांनाही बाहेर काढले.
यातील एक जण बेशुध्द होता. याची माहिती जामखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास देण्यात आली. परंतु, आरोग्य केंद्रात एकही वैद्यकीय अधिकारी हजर नव्हता. दोन्ही जखमींना खाजगी वाहनाने पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.