मोठी बातमी! ३६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ११०० पदांसाठी लवकरच पदभरती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 19:46 IST2025-10-27T19:45:35+5:302025-10-27T19:46:16+5:30
जालन्याच्या एमबीबीएस कॉलेजमध्ये ६५ पदे भरली जाणार

मोठी बातमी! ३६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ११०० पदांसाठी लवकरच पदभरती
- शिवचरण वावळे
जालना : राज्यातील ३६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षक - मार्गदर्शक व कनिष्ठ निवासी संवर्गातील ११०० पदांसाठी लवकरच पदभरती होणार आहे. यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून १४ ऑक्टोबर रोजी मंजुरी मिळाली आहे. जालना येथे नव्याने स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास २५ प्रशिक्षक - मार्गदर्शक आणि कनिष्ठ निवासी संवर्गातील ४० अशी एकूण ६५ पदांसाठी भरती होणार आहे. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनादेखील मदत होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षणातील शिक्षकांची कमतरता दूर होणार आहे.
मागील वर्षी जालना जिल्ह्यातील पहिल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता मिळाली आहे. इतकेच नव्हे तर शासकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारणीचे काम झपाट्याने सुरू असून, पुढील दीड ते दोन वर्षामध्ये इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार आहे. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्वत:च्या इमारतीमध्ये स्थलांतरित होईल अशी शक्यता अधिष्ठाता यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांची किमान संख्या निश्चित केली आहे. त्यानुसार १०० विद्यार्थ्यांसाठी २५ प्रशिक्षक - मार्गदर्शक, १५० विद्यार्थ्यांसाठी ३२, २०० विद्यार्थ्यांसाठी ४० आणि २५० विद्यार्थ्यांसाठी किमान ४३ प्रशिक्षक - मार्गदर्शक व कनिष्ठ निवासी संवर्गातील पद भरती असणे बंधनकारक आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने पदभरती साठी दिलेल्या मंजुरीमुळे वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेतील प्रशिक्षण देणे, वैद्यकीय विषयांमधील तांत्रिक बाबी समजावून सांगणे आणि संशोधनात मदत करणे हे या शिक्षकांचे मुख्य काम असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात प्रॅक्टिकल शिक्षण अधिक सखोल माहिती जाणून घेणे अधिक सोपे होणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी २५ ट्युटर - डेमोस्ट्रेटर आणि ४० कनिष्ठ निवासी असे एकूण ६५ पदे भरण्यात येणार आहेत. यामुळे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी यांच्या सोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांना देखील त्यांची मदत होणार आहे.
- डॉ. सुधीर चौधरी, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना.