नियोजनबद्ध उपाययोजना अन् सूचनांच्या पालनामुळे भराडखेडा, मात्रेवाडी कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST2021-09-04T04:36:14+5:302021-09-04T04:36:14+5:30
बदनापूर : प्रशासनाकीय सूचनांचे पालन, आरोग्य विभागाने ग्रामपंचायतीसह विविध विभागांना सोबत घेऊन केलेले नियोजन आणि उपाययोजनांमुळे तालुक्यातील भराडखेडा, मात्रेवाडी ...

नियोजनबद्ध उपाययोजना अन् सूचनांच्या पालनामुळे भराडखेडा, मात्रेवाडी कोरोनामुक्त
बदनापूर : प्रशासनाकीय सूचनांचे पालन, आरोग्य विभागाने ग्रामपंचायतीसह विविध विभागांना सोबत घेऊन केलेले नियोजन आणि उपाययोजनांमुळे तालुक्यातील भराडखेडा, मात्रेवाडी गावे कोरोनामुक्त झाली आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर तालुका आरोग्य विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या. तालुक्यातील भराडखेडा, मात्रेवाडी येथील बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांचे अलगीकरण आणि तपासणीवर अधिकचा भर देण्यात आला. ग्रामस्थांनी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करावा, यासाठी जनजागृती करण्यात आली. तसेच कोरोना लढ्यातील महत्त्वाचे असलेले लसीकरण पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली जात आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही गावे कोरोनामुक्त झाली आहेत. गावातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेळेत पूर्ण व्हावे, यासाठीही तालुका आरोग्य विभागाकडून पाठपुरावा केला जात आहे.
एकत्रितपणे केलेले प्रयत्न
ग्रामपंचायतीकडून प्रशासकीय सूचनांचे पालन. योग्य नियोजन आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून विविध उपाययोजनांवर भर दिला आहे.
बाधितांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन अलगीकरण केले. तसेच लसीकरण वेळेवर करण्यात अधिकचा भर दिला आहे.
लढा कोरोनाशी...
भारखेडा, मात्रेवाडी या गावांत आरोग्य विभागाकडून सकारात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांनी सूचनांचे पालन केल्याने गाव कोरोनामुक्त झाले आहे. इतर गावे कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. योगेश सोळंके,
तालुका आरोग्य अधिकारी
योग्य नियोजन व सूचनांच्या पालनामुळे दोन महिन्यांपासून गावात एकही रुग्ण आढळलेला नाही. दोन्ही गावांत वेळोवेळी लसीकरण केले जात आहे. शिवाय नागरिकांना स्वच्छतेसह आरोग्याची काळजी घेण्याबाबतही आरोग्य विभागाकडून माहिती दिली जाते.
-डॉ. सीमा पनाड
गावातील बाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन अलगीकरण करण्यात आले. गावात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या. गाव कोरोनामुक्तीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व ग्रामस्थांची साथ मिळाली.
-सुदेश वाठोरे,
तालुका आरोग्य पर्यवेक्षक
पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न
भारखेडा, मात्रेवाडी गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतींचे प्रयत्नही महत्त्वाचे ठरले.
गावांमधील सर्वपक्षीयांनी एकत्रित येत उपाययोजना प्रत्यक्षात राबविण्यावर भर दिल्यामुळे यश आले आहे.