जालन्यात आयपीएलवर सट्टा; स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 13:13 IST2025-03-28T13:12:10+5:302025-03-28T13:13:58+5:30
याप्रकरणी दोन आरोपीच्या ताब्यातून दोन मोबाइलसह नगदी ४० हजार ५० रुपये जप्त करण्यात आले आहेत.

जालन्यात आयपीएलवर सट्टा; स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना घेतले ताब्यात
जालना : सध्या सुरू असलेल्या आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्यांवर दोनजणांवर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली. याप्रकरणी सट्टा लावणाऱ्या दोघांसह दोन बुकींविरोधात सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना शहरात आयपीएलवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात येत असल्याचा मुद्दा आमदार अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. यामुळे जागे झालेल्या पोलिस प्रशासनाने सट्टा लावणाऱ्यावर कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी कोलकाता विरुद्ध राजस्थान मॅच दरम्यान धवल किरीटकुमार शहा (रा. सकलेचानगर), रोहित शंकर क्षीरसागर (रा. मोदीखाना) हे दोघे मोबाइलद्वारे बुकी सुभम मुदीराज, रोहित गोरक्षक यांच्याकडे सट्टा लावताना आढळून आले.
याप्रकरणी दोन आरोपीच्या ताब्यातून दोन मोबाइलसह नगदी ४० हजार ५० रुपये जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी सट्टा लावणाऱ्या दोघा आरोपींसह दोन बुकी विरोधात सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सपोनी योगेश उबाळे, अंमलदार सॅम्युअल कांबळे, रामप्रसाद पव्हरे, सुधीर वाघमारे यांनी केली.