बेकरी कामगाराचा मध्यरात्री कुऱ्हाडीने वारकरून खून; एकजण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 12:52 IST2021-02-23T12:49:21+5:302021-02-23T12:52:08+5:30
Murder news jalana मध्यरात्री एक कामगार जागी झाला असता त्याला बाहेर झोपलेल्या कामगाराचा खून झाल्याचे लक्षात आले

बेकरी कामगाराचा मध्यरात्री कुऱ्हाडीने वारकरून खून; एकजण ताब्यात
तीर्थपुरी ( जालना ) : तीर्थपुरी येथील शहागड रोडवरील समर्थ बेकरीमध्ये काम करणाऱ्या एका २४ वर्षीय कामगाराचा कुर्हाडीने वार करून खून केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. ज्ञानेश्वर बंडू शेंडगे (२४ रा. घुंगर्डे हादगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे.
रामहरी तुळशीराम सुराशे (रा. साडेगाव ता. अंबड) व संतोष परदेशी (रा. कडा ता. आष्टी जि.बीड) यांचे शहागड रोडवरील एका शेतात बेकरीचे दुकान आहे. या बेकरीमध्ये ज्ञानेश्वर शेंडगे व सचिन परदेशी (रा. सोनाई जि. नगर) व दिगंबर परदेशी (रा. घुंगर्डे हादगाव) हे तिघे काम करतात. रात्रीच्या वेळी तिघेही बेकरीत झोपतात. सोमवारी रात्री ज्ञानेश्वर हा बेकरी बाहेरील बाजावर झाेपला होता. तर सचिन बेकरीत झोपला होता. दिगंबर परदेशी हा गावाकडे गेला होता.
मध्यरात्री सचिन हा लघुशंकेसाठी उटला असता, त्याला ज्ञानेश्वरचा खून झाल्याचे कळाले. त्याने याची माहिती पोलिसांना दिली. महिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पोनि. शितलकुमार बल्लाळ, तीर्थपुरी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे, हेड काॅन्स्टेबल श्रीधर खडेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी ठस्से पथकाने पाचारण केले होते. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी तीर्थपुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला आहे. एकास ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी केली जात आहे.