बेफिकिरी भोवली, हॉटेल, पानशॉपला ३१ मार्चपर्यंत टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:31 IST2021-03-16T04:31:17+5:302021-03-16T04:31:17+5:30
बैठक : सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा जालना : गर्दीच्या ठिकाणी असलेल्या दुकानचालकांसह नागरिकांनी कोरोनाबाबत बेफिकिरी बाळगली आहे. परिणामी, ...

बेफिकिरी भोवली, हॉटेल, पानशॉपला ३१ मार्चपर्यंत टाळे
बैठक : सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा
जालना : गर्दीच्या ठिकाणी असलेल्या दुकानचालकांसह नागरिकांनी कोरोनाबाबत बेफिकिरी बाळगली आहे. परिणामी, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी ग्राहकांची गर्दी होणाऱ्या पानटपऱ्या, हॉटेलसह इतर आस्थापना ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासकीय सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी दुकानचालकांसह बहुतांश नागरिकही मास्क न लावण्यासह सुरक्षित अंतराच्या नियमांचे उल्लंघन करीत होते. वाढती रुग्णसंख्या पाहता सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी रीना बस्सैय्ये, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, उपविभागीय अधिकारी अंजली कानडे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद प्रताप सवडे, उपमुख्यकारी अधिकारी (सामान्य) नामदेव केंद्रे, उपमुख्यकारी अधिकारी (पंचायत) संजय इंगळे, अतिरिक्त शल्यचिकित्सक पद्मजा सराफ, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, पोलीस उपअधीक्षक सुधीर किरडकर, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नार्व्हेकर, डॉ. प्रताप घोडके, विविध विभागांचे अधिकारी आदींची उपस्थिती होती. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात टेस्टिंगची संख्या वाढविण्याबरोबरच हाय व लो रिस्क सहवासीतांचा अचूक शोध घेऊन त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याच्या सूचनाही बिनवडे यांनी दिल्या. तसेच नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतराचे नियम पाळावेत, प्रशासकीय सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या आस्थापना राहणार बंद
नगरपालिका व नगरपंचायत हद्दीतील सर्व हॉटेल्स, ढाबा, खाणावळ, चहाचे हॉटेल, बार रेस्टॉरंट, भेळ गाडे, पाणीपुरी गाडे, नाश्ता सेंटर, रसवंतीगृह, ज्युस सेंटर, चायनीज सेंटर, पावभाजी सेंटर आदी ग्राहकांसाठी पूर्णत: बंद राहणार आहेत. केवळ पार्सल सुविधेसाठी हॉटेल सुरू राहतील. कामगारांसाठी एमआयडीसीत कोविड सेंटर
एमआयडीसीतील कामगारांच्या मोठ्या प्रमाणात ॲण्टीजेन तपासण्या करण्यात येत आहेत. अनेक कामगार पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाच्या भीतीने कामगार निघून जाऊ नयेत तसेच औद्योगिक क्षेत्रावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी या कामगारांसाठी औद्योगिक वसाहतीमधेच कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
यंत्रणेची जबाबदारी अधिक
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सोमवारच्या बैठकीत विविध आदेश जारी केले. या आदेशांचे, सूचनांचे पालन होते का, याची तपासणी संबंधित यंत्रणा, नगर परिषद, नगरपंचायत, अन्न व औषध प्रशासन विभागाने करावी, अशा सूचना दिल्या. त्यामुळे या यंत्रणेवरील जबाबदारी वाढली असून, सूचनांची अंमलबजवणी करून घेण्यासाठी या यंत्रणेने रस्त्यावर उतरून प्रत्यक्षात तपासणी करून कारवाई मोहीम हाती घेण्याची गरज आहे.