रेल्वे पटरीवर दगडाने भरलेला ड्रम ठेवणाऱ्यास अटक
By दिपक ढोले | Updated: August 19, 2023 16:47 IST2023-08-19T16:46:57+5:302023-08-19T16:47:07+5:30
विद्युतीकरणाचे साहित्य चोरून नेताना पटरीवर सोडला ड्रम

रेल्वे पटरीवर दगडाने भरलेला ड्रम ठेवणाऱ्यास अटक
जालना : जालना ते परभणी दरम्यान असलेल्या उस्मानपूर स्थानकाजवळ ५ जुलै रोजी रेल्वे पटरीवर दगडाने भरलेला ड्रम ठेवणाऱ्या संशयितास सातोना येथून रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. बाळू मखमले असे त्या संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.
५ जुलै रोजी एका व्यक्तीने उस्मानपूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे पटरीवर दगडाने भरलेला ड्रम ठेवला होता. त्याचवेळी देवगिरी एक्स्प्रेस जात होती. परंतु, लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल परसराम सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर हा गुन्हा रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून सातोना येथून बाळू मखमले या संशयिताला ताब्यात घेतले.
विद्युतीकरणाचे साहित्य चोरून नेताना पटरीवर सोडला ड्रम
सध्या जालना ते परभणी रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण सुरू आहे. विद्युतीकरणाचे साहित्य रेल्वे पटरीच्या बाजूला ठेवले होते. सातोना - उस्मानपूर रेल्वे स्थानकादरम्यान पोल क्रमांक २३४-२३५ जवळ संशयित बाळू मखमले याची शेती आहे. बाळू हा रेल्वे विद्युतीकरणाचे साहित्य घेऊन शेतात जात होता. त्यात एका ड्रमचाही समावेश होता. त्याचवेळी देवगिरी एक्स्प्रेस आली. रेल्वेला घाबरून बाळूने ड्रम रेल्वेच्या पटरीवरच सोडला होता, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप कुमार, हवालदार सुनील नलावडे, कॉन्स्टेबल गणेश काळे यांनी केली.