Animals on the road ... | मोकाट जनावरे रस्त्यावरच...

मोकाट जनावरे रस्त्यावरच...

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील रस्त्यावर ठाण मांडणाऱ्या मोकाट जनावरांवरील कारवाई या ना त्या कारणांनी पुढे ढकलली जात आहे. या कारवाईच्या अनुषंगानेच सोमवारी सकाळी शहरातील पशुपालकांची बैठक बोलाविण्यात आली होती. मोजक्याच पशुपालकांच्या उपस्थितीत मोकाट जनावरांवरील कारवाईचा अध्याय संपन्न झाला. दोन दिवसानंतर पालिका व पोलीस प्रशासन सक्तीने कारवाई मोहीम राबविणार असल्याचा इशारा मात्र यावेळी देण्यात आला.
शहरातील मुख्य मार्ग असो अथवा अंतर्गत भागातील रस्ता; जनावरांनी ठाण मांडलेला दिसतो. २०० ते ५०० मीटर अंतरावर ही जनावरे बसलेली असतात. मोठे वाहन आले तरी रस्ता न सोडणाºया जनावरांमुळे चालकांसह शहरातील सर्वसामान्य नागरिक त्रासून गेला आहे. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वेळोवेळी होत आहे. नागरिकांच्या मागणीचा रेटा लक्षात घेता शहर वाहतूक शाखा, नगर पालिकेच्या वतीने दोन दिवसांपूर्वी शहरातील पशुपालकांनी आपापल्या जनावरांना दिवसभर शेतात किंवा गोठ्यात बांधून ठेवावे, अन्यथा जनावरे पकडून कोंडवाड्यात टाकण्यात येतील, असा इशारा देण्यात आला होता. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने जनावरे कोंडण्यासाठी गो-शाळेची पाहणी करण्यात आली होती.
पाहणी अध्यायानंतर धडक कारवाईसत्र सुरू होईल, अशी अपेक्षा शहरवासियांना होती. मात्र, कारवाईला पुन्हा ब्रेक लागला आणि पशुपालकांसमवेतच्या बैठकीसाठी सोमवारचा मुहूर्त साधण्यात आला. \
प्रतिदिन : ७०० रूपये दंड
दोन दिवसानंतर पालिका व पोलीस प्रशासनाची मोकाट जनावरांविरूध्द कारवाई सुरू होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. प्रतिदिन १०० रूपये दंड व गो-शाळेतील ६०० रूपये खर्च असा ७०० रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
जनावरे सोडताना १०० रूपयांच्या बँडवर पशुपालकांकडून शपथपत्र करून घेतले जाणार आहे. तीन दिवसांत जनावरे नेली नाहीत तर त्यांचा पालिकेमार्फत लिलाव केला जाणार असल्याचा इशारा देण्यात आला.
पालिकेची भूमिका महत्त्वाची
वाहतूक शाखेने पालिकेने मोकाट जनावरांना कोंडवाड्यात टाकावे, यासाठी मागील वर्षभरापासून अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे. वाहतूक शाखेचा पाठपुरावा आणि नागरिकांचा रेटा पाहता नगर पालिकेने आता मोकाट जनावरांविरूध्द कारवाईसाठी कंबर कसली आहे. मात्र, कारवाईचे सत्र वेळेत सुरू होणे आणि त्यात सातत्य ठेवण्यात पालिकेची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

Web Title: Animals on the road ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.