वृद्धेचा गळा चिरून मृतदेह शेतात फेकला, पिशवीतील चिट्ठीवरून पटली ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 19:06 IST2022-03-11T19:05:32+5:302022-03-11T19:06:35+5:30
पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता, गळ्याला दोरी बांधलेली होती. धारदारशस्त्राने महिलेचा गळा व मानेवर वार करण्यात आले होते.

वृद्धेचा गळा चिरून मृतदेह शेतात फेकला, पिशवीतील चिट्ठीवरून पटली ओळख
जालना : एका ६५ वर्षीय महिलेचा गळा आवळून व धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना बदनापूर तालुक्यातील साखरवाडी येथे गुरूवारी रात्री उघडकीस आली. सुमनबाई माणिक जिगे (६५ रा. पानशेंद्रा, ता.जि. जालना) असे मयत महिलेचे नाव आहे.
या प्रकरणी शुक्रवारी सकाळी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील कंडारी ते चिखली रोडवरील साखरवाडी जवळील एका शेतातील लिंबाच्या झाडाखाली महिलेचा मृतदेह ग्रामस्थांना दिसून आला. ग्रामस्थांनी याची माहिती बदनापूर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता, गळ्याला दोरी बांधलेली होती. धारदारशस्त्राने महिलेचा गळा व मानेवर वार करण्यात आले होते.
शिवाय, महिलेच्या कंबरेला असलेल्या पिशवीतील कागदावर एका व्यक्तीचा मोबाईल क्रमांक दिसून आला.त्यानंतर महिलेची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी बदनापूर येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविला. या प्रकरणी मयत महिलेचा पुतण्या चंद्रकांत जिगे यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाला पोनि. शिवाजी बंटेवाड यांनी भेट दिली.