पंढरपूर दर्शन ठरलं शेवटचं; चंद्रभागेत स्नान करताना भोकरदनच्या दोन महिला भाविकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 16:40 IST2025-07-19T16:39:02+5:302025-07-19T16:40:02+5:30

भोकरदन तालुक्यातील धावडा येथून एकूण १५ भाविक पंढरपूर दर्शनासाठी गेले होते.

After Pandharpur Darshan Two female devotees of Bhokardan die while bathing in Chandrabhaga | पंढरपूर दर्शन ठरलं शेवटचं; चंद्रभागेत स्नान करताना भोकरदनच्या दोन महिला भाविकांचा मृत्यू

पंढरपूर दर्शन ठरलं शेवटचं; चंद्रभागेत स्नान करताना भोकरदनच्या दोन महिला भाविकांचा मृत्यू

भोकरदन (जि. जालना) : पंढरपूरच्या चंद्रभागा नदीपात्रात पवित्र स्नानासाठी गेलेल्या धावडा (ता. भोकरदन) येथील दोन महिला भाविकांचा पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 19 जुलै रोजी सकाळी 6 ते 7 च्या सुमारास घडली. या घटनेने धावडा गावावर शोककळा पसरली आहे.

18 जुलै रोजी भोकरदन तालुक्यातील धावडा येथून एकूण 15 भाविक (12 महिला, 2 पुरुष) फलटण एसटी बसने आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर दर्शनासाठी गेले होते. त्यांनी मुक्ताबाई मठात मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण चंद्रभागा नदीपात्रात स्नानासाठी गेले होते.

मात्र, रात्री उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडले गेले होते, याची कल्पना भाविकांना नव्हती. याच दरम्यान, संगीता संजू सपकाळ (वय 40) यांना पाण्याच्या प्रवाहाने खेचून नेले. त्यांना वाचवण्यासाठी सुनीता महादेव सपकाळ (वय 43) यांनी आपल्या साडीचा किनारा फेकून मदतीचा प्रयत्न केला, परंतु प्रवाह इतका जोरदार होता की दोघीही पाण्यात वाहून गेल्या.

संगीता यांचा मृतदेह सकाळी 10 वाजता, तर सुनीता यांचा मृतदेह दुपारी 2 वाजता सापडला. या घटनेची माहिती मिळताच दोन्ही महिलांचे पती संजू सपकाळ आणि महादेव सपकाळ हे आपल्या नातेवाइकांसह पंढरपूरला पोहोचले आहेत.

Web Title: After Pandharpur Darshan Two female devotees of Bhokardan die while bathing in Chandrabhaga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.