भाचीला गावाकडे नेणाऱ्या मामाचा अपघाती मृत्यू; मुलीसह वडील गंभीर जखमी
By विजय मुंडे | Updated: December 23, 2023 19:38 IST2023-12-23T19:38:24+5:302023-12-23T19:38:49+5:30
मालवाहतूक वाहनाची दुचाकीला धडक

भाचीला गावाकडे नेणाऱ्या मामाचा अपघाती मृत्यू; मुलीसह वडील गंभीर जखमी
परतूर : भाचीला गावाकडे नेणाऱ्या मामाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी वाटूर मार्गावरील कंडारी पाटीजवळ घडली. मालवाहतूक वाहनाने विरुद्ध दिशेने येत दुचाकीला जाेराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुलीसह तिचे वडीलही गंभीर जखमी झाले आहेत.
नितीन जनार्दन नरवडे (वय ४५, रा. नांदलगाव, ता. पैठण) असे मयताचे नाव आहे. तर विनोद सदाशिव पांडे (वय ५०), प्रेरणा विनोद पांडे (वय १७, सर्व रा. बीडकिण, ता. पैठण) अशी जखमींची नावे आहेत. नांदलगाव येथील प्रेरणा पांडे ही मुलगी आंबा येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेत आहे. प्रेरणा पांडे हिला गावाकडे नेण्यासाठी तिचे वडील विनोद पांडे, मामा नितीन नरवडे हे दोघे शनिवारी जवाहर नवोदय विद्यालयात आले होते. प्रेरणाला घेऊन ते दोघे दुचाकीवरून (एमएच २० - एफआर ७४९१) गावाकडे परत निघाले होते. त्यांची दुचाकी वाटूर मार्गावरील कंडारी पाटीजवळ असताना समोरून विरुद्ध दिशेने आलेल्या एका मालवाहतूक वाहनाने त्यांना जोराची धडक दिली.
या अपघातात नितीन नरवडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रेरणा पांडे व तिचे वडील विनोद पांडे हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर मालवाहतूक चालक वाहनासह फरार झाला. पो.हे.कॉ. शेख, पो.कॉ. रामेश्वर माने यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
प्राचार्यांनी नाकारली हाेती सुटी
प्रेरणाला गावाकडे नेण्यासाठी पालकांनी प्राचार्यांकडे विनंती केली होती. त्यावेळी प्राचार्यांनी सुटी नाकारली होती. परंतु, आजाराचे कारण पुढे करीत पालक प्रेरणाला गावाकडे घेऊन निघाले. दरम्यान, अपघातात तिच्या मामांचा मृत्यू तर वडिलांसह प्रेरणा जखमी झाली. या घटनेने जवाहर नवोदय विद्यालय परिसरातही हळहळ व्यक्त केली जात होती.