कौटुंबिक कारणातून जवानाचे टोकाचे पाऊल; स्वतःवर गोळी झाडून घेत केली आत्महत्या
By दिपक ढोले | Updated: August 10, 2022 15:26 IST2022-08-10T15:26:13+5:302022-08-10T15:26:44+5:30
जालना येथे कर्तव्यावर असताना स्वतःवर झाडली गोळी; उपचारादरम्यान जवानाचा मृत्यू

कौटुंबिक कारणातून जवानाचे टोकाचे पाऊल; स्वतःवर गोळी झाडून घेत केली आत्महत्या
जालना : येथील राज्य राखीव दलाच्या बल गट तीनमध्ये कर्तव्यावर असलेल्या एका जवानाने स्वत:च्या रायफलमधून मानेवर गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली होती. अनिल दशरथ गाढवे (३५, रा. जालना) असे त्या जवानाचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घरगुती कारणातून जवानाने टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती असून, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अनिल गाढवे हे मंगळवारी एसआरपीएफ कॅम्पमध्ये क्वॉर्टरगार्ड ड्युटी होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांनी स्वत:जवळील रायफल मानेला लावून गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच राज्य राखीव दलाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने मंठा चौफुली परिसरातील खासगी रुग्णालयात हलविले. तेथून त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णवाहिकेतून औरंगाबादला हलविण्यात आले होते. उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला.