राजेश टोपेंना धक्का, तीर्थपुरी नगरपंचायतीत सत्ताधारी राष्ट्रवादीचे नगरसेवक बंडाच्या तयारीत
By महेश गायकवाड | Updated: May 29, 2023 15:24 IST2023-05-29T15:21:32+5:302023-05-29T15:24:10+5:30
दीड वर्षात नगरपंचायत क्षेत्रात विकासकामे होत नसल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे.

राजेश टोपेंना धक्का, तीर्थपुरी नगरपंचायतीत सत्ताधारी राष्ट्रवादीचे नगरसेवक बंडाच्या तयारीत
जालना : घनसावंगी तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या तीर्थपुरी नगरपंचायतीच्या निवडणुका होऊन जवळपास दीड वर्षाचा कालावधी होत आहे. राष्ट्रवादी व भाजपने एकत्र येत नगरपंचायतीवर सत्ता स्थापन केली. परंतु, दीड वर्षात नगरपंचायत क्षेत्रात विकासकामे होत नसल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे. राष्ट्रवादीपेक्षा इतर पक्ष बरा म्हणण्याची वेळ राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर आली असून, त्यांनी पक्षबदलाच्या हालचाली सुरू केल्याची चर्चा तीर्थपुरीत सुरू आहे.
आमदार राजेश टोपे यांनी मंत्री असताना तीर्थपुरी नगरपंचायतीला मंजुरी मिळवली. त्यानंतर कारभारी निवडण्यासाठी निवडणुका झाल्या. पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी स्थानिक नेते महेंद्र पवार व विद्यमान नगर उपाध्यक्ष शैलेंद्र पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आणले. या निवडणुकीत भाजपाचे २ तर शिवसेनेचे ३ उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले होते. तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला होता. राष्ट्रवादीने भाजपाच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केली. त्यांच्या सत्तेला दीड वर्ष आता झाले आहे. या काळात अपेक्षित अशी विकास कामे झाली नाहीत. नगरसेवकांना निधी न मिळाल्याने तेदेखील नाराज आहेत. तीर्थपुरीला शहराचा दर्जा मिळाला. परंतु रस्ते अजून गावखेड्यासारखेच आहेत. तीर्थपुरी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यावर मोठा विकास होईल, गावाला शहराचे रूप येईल, अशी अपेक्षा नागरिकांची होती.
परंतु, ती तूर्त तरी फोल ठरत आहेत. शहरात पंतप्रधान शहरी आवास योजना लागू झाली. परंतु, गरिबांना घरकुल मिळालेले नाही. सांडपाण्याचा प्रश्न कायम आहे. खराब रस्त्याची सुधारणा करण्यासाठी आंदोलने करावी लागली. या सर्व कामांचे निवडणुकीत आश्वासन जनतेला देण्यात आले होते. परंतु, त्याची पूर्तता दीड वर्षात झाली नाही. घनसावंगीला मोठ्या प्रमाणात निधी येतो तर तीर्थपुरीला का मिळत नाही, असा प्रश्न जनता आणि नगरसेवक उपस्थित करत आहेत. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते इतर पक्षात जाण्याचा विचार करत असल्याची चर्चा सध्या शहरात होत आहे.
विकास निधी मिळाला नाही
तीर्थपुरी शहराच्या विकासासाठी कोणताच निधी आला नाही. घरकुल योजना, शहरातील रस्ते, भूमिगत गटार योजना अशी कोणतीही कामे होत नसेल तर जनतेच्या हितासाठी नगरसेवकांना घेऊन अन्य पक्षाचे दारे ठोठावावे लागेल.
- महेंद्र पवार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, राष्ट्रवादी