पुणे-नागपूर खासगी बस पुलाखाली कोसळली; २० प्रवासी जखमी, चौघांची प्रकृती गंभीर
By विजय मुंडे | Updated: September 26, 2023 11:42 IST2023-09-26T08:02:52+5:302023-09-26T11:42:57+5:30
एक खासगी बस (एम. एच.४०- सी. एम.६९६९) ही पुण्याहून नागपूरच्या दिशेने जात होती.

पुणे-नागपूर खासगी बस पुलाखाली कोसळली; २० प्रवासी जखमी, चौघांची प्रकृती गंभीर
विजय मुंडे
जालना: चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव खासगी बस पुलाखाली कोसळून झालेल्या अपघातात २० प्रवासी जखमी झाले. यातील चौघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी शिवारात घडली.
एक खासगी बस (एम. एच.४०- सी. एम.६९६९) ही पुण्याहून नागपूरच्या दिशेने जात होती. ही बस छत्रपती संभाजीनगर ते जालना मार्गावरील मात्रेवाडी (ता. बदनापूर) शिवारात आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाखाली कोसळली. अपघाताची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले. जखमींमध्ये अमन कुमार (१९ मध्यप्रदेश), अनिता इंगोले (३५), शहाबज खान, रवींद्र राजे (३३), रितेश चंदेल (२३), पराग शिंगणे (४२ नागपूर), निकेल मानिजे (२३ वर्धा), किरण मांटुळे (३८ यवतमाळ), संभाजी सासणे (३२ यवतमाळ), मधुकर पोहरे (४० अमरावती), गणेश भिसे (३७ यवतमाळ), मोहम्मद सैफुद्दीन (३० ), सागर उपाय्या (१९ मध्य प्रदेश), वर्षा नागरवाडे (४०यवतमाळ), शुभम हत्तीमारे (२७ गोंदिया) यांचा समावेश आहे जखमींवर जालना येथील जिल्हा रुग्णालयातील डॉ. उमेश जाधव, डॉ. अनुराधा जाधव व त्यांच्या टीमने उपचार केले.
घटनास्थळी पोलिस बंदोबस्त
अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांचे साहित्य बस मध्ये आहे. त्या साहित्याची चोरी होऊ नये यासाठी घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती पोनि. सुदाम भगवात यांनी दिली.