दुचाकीला वाचविण्याच्या नादात पेट्रोलचा ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी
By दिपक ढोले | Updated: April 16, 2023 15:32 IST2023-04-16T15:32:17+5:302023-04-16T15:32:53+5:30
ट्रक क्रमांक (एमएच.१६.सीडी.५०१३) हा ट्रक पेट्रोल घेऊन कुंभार पिंपळगावहून आष्टीकडे रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास जात होता.

दुचाकीला वाचविण्याच्या नादात पेट्रोलचा ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी
जालना : दुचाकी चालकाला वाचविण्याच्या नादात पेट्रोल घेऊन जाणारा ट्रक उलटल्याची घटना आष्टी ते कुंभारी पिंपळगाव रोडवरील ढाेणवाडी पाटीजवळ रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. यात ट्रकचालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
ट्रक क्रमांक (एमएच.१६.सीडी.५०१३) हा ट्रक पेट्रोल घेऊन कुंभार पिंपळगावहून आष्टीकडे रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास जात होता. ढोणवाडी पाटीजवळ आल्यावर दुचाकी चालकाला वाचविण्याच्या नादात ट्रक उलटला. यात ट्रकचालक खलील जैरुद्दीन शेख ( ६०, रा. मनमाड) हे जखमी झाले. त्यांच्यावर आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जालना येथे पाठवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. पंडित चव्हाण यांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच आष्टी पोलिस ठाण्याचे सपोनि. सोमनाथ नरके यांनी घटनास्थळी भेट दिली. इंडियन ऑइल कंपनीचे पेट्रोल घेऊन ट्रक मनमाड येथून पाथरीकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तातडीने परतूर येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.