धूलिवंदनादिनीच ऊसतोड कामगार कुटुंबावर दु:खाचा डोंगर; दोन मुलींचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू
By विजय मुंडे | Updated: March 26, 2024 19:16 IST2024-03-26T19:16:26+5:302024-03-26T19:16:53+5:30
ही घटना एका महिलेने पाहिली. त्या महिलेने आरडाओरड करताच, आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली

धूलिवंदनादिनीच ऊसतोड कामगार कुटुंबावर दु:खाचा डोंगर; दोन मुलींचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू
गोंदी (जि.जालना) : कपडे धुण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलींचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी ऐन धूलिवंदनदिनी गोंदी गावच्या वैतागवाडी (ता.अंबड) शिवारात घडली.
अरसिंन हुसेन शेख (वय १४ रा.गोंदी), कमल सुभाष भालेराव (वय १४ रा.हलदोला ता.बदनापूर ह.मु.गोंदी शिवार) अशी मयत मुलींची नावे आहेत. अंबड तालुक्यातील गोंदी शिवारातील शेतात शेख, भालेराव हे ऊसतोड कुटुंबीय राहतात. धूलिवंदनाचा सण संपल्यानंतर सोमवारी दुपारी अरसिंन शेख व कमल भालेराव या दोन १४ वर्षीय मुली कपडे धुण्यासाठी वैतागवाडी शिवारातील बंधाऱ्यावर गेल्या होत्या. कपडे धूत असताना, अचानक पाय घसरून आतमध्ये पडल्याने त्या बुडू लागल्या.
ही घटना एका महिलेने पाहिली. त्या महिलेने आरडाओरड करताच, आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली, परंतु त्या दोघीही तोपर्यंत आतमध्ये बुडाल्या होत्या. तेथे आलेल्या नागरिकांनी बंधाऱ्यात उड्या घेऊन त्या दोघींचा शोध घेतला. त्यांना दवाखान्यात नेले असता, डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले. मयत मुलींच्या पार्थिवाचे गोंदी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. मयत कमल सुभाष भालेराव हिच्या पार्थिवाला हलदोला येथे, तर मयत अरसिंन हुसेन शेख हिच्या पार्थिवाला गोंदी येथील स्मशानभूमीत दफन करण्यात आले. याबाबत गोंदी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.