नगरपालिकेकडे बिल थकल्याने कंत्राटदाराचा आत्महत्येचा प्रयत्न
By दिपक ढोले | Updated: September 23, 2022 17:32 IST2022-09-23T17:31:34+5:302022-09-23T17:32:13+5:30
थकित बिल मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या महेश भालेराव यांनी सकाळी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

नगरपालिकेकडे बिल थकल्याने कंत्राटदाराचा आत्महत्येचा प्रयत्न
जालना : नगरपालिकेकडे थकलेले सुमारे चार कोटी रुपयांचे बिल मिळावे यासाठी मुख्याधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने पालिकेच्या एका कंत्राटदाराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी शहरातील नरीमन नगरात येथे घडली. महेश भालेराव, असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या कंत्राटदाराचे नाव असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महेश भालेराव मागील काही वर्षांपासून नगरपालिकेला कंत्राटी पध्दतीने सखाराम एजन्सी व गुरुदत्त एजन्सीच्या माध्यमातून लेबर सप्लाय, शहर स्वच्छता, घंटागाड्या, जेसीबी व अन्य साहित्य पुरवठ्याचे काम करतात. या कामाचे सुमारे चार कोटी रुपयांचे बिल पालिकेकडे थकल्याचा दावा कंत्राटदार महेश भालेराव व त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. बिल मिळावे यासाठी ते पालिका प्रशासनासह मुख्याधिकाऱ्यांकडे मागील काही महिन्यांपासून वारंवार पाठपुरावा करत आहेत. मात्र, थकित बिल मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या महेश भालेराव यांनी सकाळी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, कुटुंबियांनी त्यांना तातडीने रेल्वेस्टेशन रोडवरील खाजगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना विचारले असता, आपण जून २०२२ मध्ये जालना नगरपालिकेत रुजू झालो. आपण रुजू झाल्यानंतर सदर कंत्राटदाराची जानेवारी पूर्वीची मोठ्या रकमेची बिले अदा केली असून, अद्यापही जवळपास २५ लाखांपर्यंतची बिले थकित असतील. सदर कंत्राटदाराच्या एजन्सीचे जानेवारीपासून पुढच्या कामाचे एकही बिल पालिकेत सादर झालेले नाही. सध्या पालिकेकडे निधी उपलब्ध नाही. निधी उपलब्ध झाल्यावर सर्व थकबाकीचे बिले दिली जातील. या कंत्राटदाराने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणाशी आपला कुठलाही वैयक्तिक संबंध नाही, असे त्यांनी सांगितले.