शहागडमध्ये सशस्त्र दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:29 AM2019-08-11T00:29:04+5:302019-08-11T00:29:14+5:30

अंबड तालुक्यातील शहागड येथील एका व्यावसायिकाच्या घरावर शनिवारी पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला.

26 lacs dacoit in Shahgad | शहागडमध्ये सशस्त्र दरोडा

शहागडमध्ये सशस्त्र दरोडा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : अंबड तालुक्यातील शहागड येथील एका व्यावसायिकाच्या घरावर शनिवारी पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला. रोख रक्कम, दागिन्यांसह तब्बल २६ लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.
अंबड तालुक्यातील शहागड येथील व्यावसायिक माणिकलाल जैस्वाल यांचा मोठा मुलगा मनोज जैस्वाल हा कामानिमित्त औरंगाबादला गेला होता. तर छोटा मुलगा, एक मुलगी व पती-पत्नी हे चार सदस्य घरी होते. माणिकलाल जैस्वाल हे नेहमीप्रमाणे दोन बिअरबार, एक देशी दारू दुकान, हॉटेल बंद करून शुक्रवारी रात्री घरी झोपले होते.
शुक्रवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात दरोडेखोरांनी जैस्वाल यांच्या घराबाहेर पाळत ठेवली. तर चार दरोडेखोरांनी घरातील व परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तोडून, काहींचे तोंड फिरवून, तर काहींचे वायर डिस्कनेक्ट केला. बांधकामासाठी वापरात असलेल्या सीडीचा वापर करत किचन खिडकीची जाळी काढून घरात प्रवेश केला. तद्नंतर हॉलमध्ये प्रवेश करून प्रथम छोटा मुलगा, मुलगी असलेल्या खोलीत प्रवेश केला. मुलांजवळील मोबाईल हिसकावून घेत दार बाहेरून बंद केले. तद्नंतर माणिकलाल जैस्वाल असलेल्या रूमचे दार लावून घेत त्यांच्या पत्नी रेखा जैस्वाल असलेल्या बेडरूम मध्ये प्रवेश केला.
त्यांनी आरडाओरडा करु नये म्हणून त्याच्या छातीवर पाय ठेवून तलवारीचा धाक दाखविला. कपाटातील तिजोरी उघडून दवाखान्यात जाण्यासाठी ठेवलेले ४ लाख रुपये, बँकांना सुट्ट््या असल्याने हॉटेल, बार व्यवसायाचे ३ लाख रुपये, तर घरातील नवे, जुने असे तब्बल ५० तोळे सोन्याचे दागिने चोरून घराच्या पाठीमागे असलेल्या शेतीमधून पलायन केले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
२५ किलोमीटर अंतर पिंजले
घटनेनंतर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, डीवायएसपी सी.डी.शेवगण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर, एडीएसचे पोनि यशवंत जाधव, पोलीस नाईक संजय मगरे, एपीआय शिवानंद देवकर, उपनिरीक्षक हनुमंत वारे, धनंजय कवाडे, गोपनीय शाखेचे पो. कॉ.महेश तोटे, बाबा डमाळे आदींनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
त्यानंतर दरोडेखोरांच्या शोधार्थ वडी (ता.अंबड) ते गढी (जि.बीड) असा २५ किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. मात्र, चोरटे हाती लागले नाहीत.
तीन वर्षांपूर्वीची आठवण उजागर
माणिकलाल जैस्वाल यांच्या बाजूला राहणारे अब्दुल कादर कुरेशी यांच्या घरी गत तीन वर्षांपूर्वी असाच नियोजनबद्ध दरोडा टाकण्यात आला होता. माणिकलाल जैस्वाल यांच्या घरी पडलेल्या दरोड्याचा घटनाक्रम तसाच आहे. त्यामुळे कुरेशी यांच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांनीच तीन वर्षानंतर जैस्वाल यांच्या हालचालींवर नजर ठेवून नियोजनबद्ध दरोडा टाकल्याची परिसरात चर्चा आहे.
घटनेनंतर आरडाओरड ऐकून परिसरातील हॉटेल व्यावसायिक, शेजारी धावून आले. घटना समजताच उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते.
तातडीने श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वानाने दरोडा स्थळापासून वाळकेश्वर च्या मुख्य रस्त्यापर्यंतच माग काढला. मात्र तेथे श्वान घुटमळले.

Web Title: 26 lacs dacoit in Shahgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.