२२ लाख दिले, पण गॅस एजन्सी नाही भेटली; नंतर कळले वेबसाईट बनावट आहे
By दिपक ढोले | Updated: April 1, 2023 16:58 IST2023-04-01T16:57:31+5:302023-04-01T16:58:34+5:30
पोलिसांनी याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या तिघांना जेरबंद केले आहे

२२ लाख दिले, पण गॅस एजन्सी नाही भेटली; नंतर कळले वेबसाईट बनावट आहे
जालना : गॅस एजन्सीची बनावट वेबसाईट बनवून अनेकांना गंडा घालणाऱ्या तिघांना जेरबंद करण्यात आले आहे. ही कारवाई जालना सायबर पोलिसांनी शनिवारी केली. एकाला लखनऊ तर दोघांना दिल्ली येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनुराग देवेश तिवारी (२९ रा. गोमतीनगर, लखनऊ, उत्तरप्रदेश), संजय प्रसाद कपीलप्रसाद पटेल, अभिषेक संजयप्रसाद पटेल (२३ रा. दिल्ली) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
जालना येथील डॉ. विशाल धानुरे यांची गॅस एजन्सी देतो, असे म्हणून जवळपास २२ लाख १६ हजार ५०० रूपयांची फसवणूक झाली होती. या प्रकरणी २५ नोव्हेंबर २०२२ रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून सुरूवातीला संशयित आरोपी अनुराग देवेश तिवारी याला लखनऊ येथून ताब्यात घेतले. त्याने साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. नंतर पोलिसांनी दिल्ली येथे जाऊन संशयित संजयप्रसाद पटेल, अभिषेककुमार पटेल यांना ताब्यात घेतले. ते दोघेही बापलेक असून, त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींकडून १८ लाख ५३ हजार ७४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.