गोठ्यात घुसून वन्यप्राण्याने १६ शेळ्यांचा पाडला फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 16:36 IST2021-01-30T16:07:43+5:302021-01-30T16:36:10+5:30
केवळ दोन तास शेतात कोणी नव्हते त्या दरम्यान झालेल्या या हल्ल्यात जवळपास १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

गोठ्यात घुसून वन्यप्राण्याने १६ शेळ्यांचा पाडला फडशा
भोकरदन : तालुक्यातील देहेड येथील शेतकऱ्याच्या गोठ्यावर हल्ला करून वन्यप्राण्याने 16 शेळ्यांचा फडशा पाडल्याची घटना शनिवारी ( दि, ३० ) सकाळी उघडकीस आली.
देहेड येथील शेतकरी परमेश्वर रतन बावस्कर यांचे भांडरगडा जवळ शेतात जनावरांचा गोठा आहे. बावस्कर यांनी शुक्रवारी ( दि. २९ ) रात्री या गोठ्यात ६ म्हैस, बैल व 20 शेळ्या बांधल्या. ते स्वतः रात्री गोठ्यावरच झोपले. शनिवारी सकाळी 5 ते 6 च्या दरम्यान झोपेतून उठून जनावरांना चारा टाकून ते आंघोळीसाठी देहेड येथे घरी आले. त्यानंतर सकाळी 9 ला ते शेतात परतले. तेव्हा त्यांना गोठ्यातील दृष्यपाहून धक्काच बसला. गोठ्यातील १६ शेळ्यांचा अज्ञात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यांनी आरडाओरडा केला तेंव्हा शेजारील शेतकरी धावत आले. गोठ्यातील जाळी तोडून शेळ्यांवर हल्ला झाला.
केवळ दोन तास शेतात कोणी नव्हते त्या दरम्यान झालेल्या या हल्ल्यात शेतकऱ्याचे जवळपास १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाला याची माहिती दिली आहे. मात्र, दुपारी 3 वाजेपर्यंत कोणीही या घटनास्थळी दाखल झाले असल्याचे बावस्कर यांनी सांगितले. दरम्यान हा हल्ला बिबट्या किंवा लांडग्यांनी हल्ला केल्याचा संशय आहे. वनविभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी बावस्कर यांनी केली आहे.