CoronaVirus News: कोरोनाबद्दल जगाला सतर्क करणाऱ्या चिनी डॉक्टरच्या सहकाऱ्याचा मृत्यू; दोन महिने होते कोमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 19:59 IST2020-06-02T19:57:02+5:302020-06-02T19:59:24+5:30
वुहानमधील डॉक्टराचा आयसीयूमध्ये मृत्यू; वयाच्या ४२ व्या वर्षी निधन

CoronaVirus News: कोरोनाबद्दल जगाला सतर्क करणाऱ्या चिनी डॉक्टरच्या सहकाऱ्याचा मृत्यू; दोन महिने होते कोमात
बीजिंग: कोरोना विषाणूची बाधा झाल्यानं शरीरात अतिशय विचित्र बदल आणि गुंतागुंत निर्माण झालेल्या चिनी डॉक्टरचा वयाच्या ४२ व्या वर्षी मृत्यू झाला आहे. डॉ. हू वेईफेंग यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या त्वचेचा रंग काळा झाला होता. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. २२ एप्रिलला ब्रेन हॅम्ब्रेज झाल्यानंतर वेईफेंग यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासून वुहान टोंगजी रुग्णालयात कोमामध्ये होते.
वेईफेंग यांच्या डोक्यात तयार झालेला अनावश्यक स्राव काढण्यासाठी शनिवारी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती एका डॉक्टरांनी साऊथ चायना मॉर्निंग पोस्टला दिली. नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्यांनी ही माहिती सांगितली. डॉ. हू आणि त्यांचे सहकारी डॉ. यी यांचं शरीर कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर काळं पडलं. वुहानच्या केंद्रीय रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार करताना पाच महिन्यांपूर्वी दोन्ही डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली.
डॉ. हू वेईफेंग यांनी डॉ. ली वेनलिअंग यांच्यासोबत काम केलं होतं. वेनलिअंग यांनीच जीवेघण्या कोरोना विषाणूबद्दल जगाला धोक्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. ७ फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला. यानंतर मार्चमध्ये त्यांच्या आणखी दोन सहकाऱ्यांचा (मेई झोंगमिंग, झु हेपिंग) यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. या सगळ्या घटनाक्रमानंतर चीनकडे संशयानं पाहिलं जाऊ लागलं.
चीनच्या वुहानमधून कोरोना जगभरात पसरला. प्राण्यांच्या मांसाची विक्री करणाऱ्या एका बाजारातून कोरोना पसरल्याचं चीननं जगाला सांगितलं. मात्र या प्राण्यांच्या मांसाचे नमुने चीननं जगापुढे आणले नाहीत. दोनच दिवसांपूर्वी चीननं यावरुनही यू-टर्न घेतला. वुहानमधील बाजाराला उगाच खलनायक ठरवण्यात आलं. कोरोना विषाणू या बाजारातून पसरलाच नव्हता, अशी भूमिका चीननं घेतली.
लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे केजरीवालांच्याही पुढे; पण...
खबरदारी घ्या, सूचनांचं पालन करा, वादळानंतर पर्यावरणमंत्र्यांचं जनतेला आवाहन
...तर ठाकरे सरकार कोणीही वाचवू शकणार नाही; अमित शहांचं सूचक विधान