तिसरे महायुद्ध एका पावलावर; पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर पुतिन यांनी दिला अमेरिकेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 03:28 PM2024-03-19T15:28:19+5:302024-03-19T15:28:55+5:30

२००० पासून पुतिन राष्ट्राध्यक्षपदी आहेत. २०३६ पर्यंत ते राष्ट्राध्यक्ष राहू शकतात.

World War III in One Step; After becoming president for the fifth time, Putin warned America | तिसरे महायुद्ध एका पावलावर; पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर पुतिन यांनी दिला अमेरिकेला इशारा

तिसरे महायुद्ध एका पावलावर; पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर पुतिन यांनी दिला अमेरिकेला इशारा

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे त्या पदावर पाचव्यांदा निवडून आले असून त्यांना ८७.२९ टक्के इतकी विक्रमी मते मिळाली आहेत असे तेथील निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केले. त्या देशाच्या सत्तेवर पुतिन यांचे पूर्ण नियंत्रण असल्याचे या विजयातून दिसून आले आहे. दरम्यान रशिया व अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो संघटना यांच्यातील संघर्षामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्याजवळ आले असल्याचा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेला   दिला आहे.

या निवडणुकीत पुतिन यांच्या विरोधात तीन उमेदवार उभे होते. मात्र, त्यांच्यापैकी एकानेही युक्रेनच्या युद्धाला विरोध केला नव्हता. सुमारे २५ वर्षे सत्ता गाजविलेल्या पुतिन यांना राज्य करण्यासाठी आणखी सहा वर्षे मिळाली आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियातील सुमारे ७ कोटी ६० लाख मतदारांनी मतदान केले. पुतिन यांनी निवडणुकांत  विरोधकांचा आवाज दडपून टाकल्याचे प्रयत्न केल्याचाही आरोप झाला होता. मात्र, त्याबद्दल रशियाच्या सरकारने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. आपल्यावर जनतेने विश्वास दाखवून राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवडून दिले असल्याचे व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे. 

कोणत्या देशांनी केले अभिनंदन?

कोठडीत मरण पावलेले नेते ॲलेक्सी नवलनी यांच्या पत्नी युलिया नवलनाया यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करताना आपल्या पतीचे नाव मतपत्रिकेवर लिहिले. पुतीन यांची रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भारत, चीन, होंडारूस, निकारागुवा, व्हेनेझुएला, उत्तर कोरिया, ताझिकिस्तान, उझबेकिस्तान या देशांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

युद्धाची व्याप्ती वाढणार? 

१९६२ नंतर प्रथमच पाश्चात्त्य देश आणि रशिया यांच्यातील संघर्ष विकोपाला पोहोचला आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भविष्यात युक्रेनमध्ये नाटोचे सैन्य उतरविण्याची शक्यता बोलून दाखविली होती. याला पूर्व युरोपातील अनेक देशांचा पाठिंबा होता. यानंतर पुतिन अधिक आक्रमक झाले असून, रशिया आणि नाटो यांच्यातील संघर्षाच्या शक्यतेबाबत विचारले असता पुतिन म्हणाले की, आधुनिक जगात सर्वकाही शक्य आहे. त्यामुळे भविष्यात युद्धाची व्याप्ती वाढण्याची भीती असल्याचे संरक्षण विश्लेषकांनी म्हटले आहे.

युद्ध परवडणार नाही

- रशिया व अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो संघटना यांच्यातील थेट युद्ध जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवेल, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिला. 
- ते म्हणाले की, तिसरे महायुद्ध होणे कोणालाही परवडण्यासारखे नाही. युक्रेनमध्ये नाटो देशांचे सैनिकही युद्धात सहभागी असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे.

पुतीन यांचा प्रवास...

-जन्म ७ ऑक्टोबर १९५२ शिक्षण लेनिनग्राड स्टेट युनिव्हर्सिटीतून कायदा आणि अर्थशास्त्रात शिक्षण घेतले
-राजकारणात येण्याअगोदर : पुतीन यांनी केजीबी या रशियन गुप्तहेर संस्थेत १६ वर्षे नोकरी केली.
-१९९९ मध्ये पुतिन रशियाचे काळजीवाहू पंतप्रधान झाले
-१९९६ मध्ये राजकारणात प्रवेश

पुतिन यांची मारिया वोरोन्सोवा ही मुलगी व्यवसायात तर कॅटरिना टिखोनोव्हा ही संशोधन संस्थेची प्रमुख आहे. २००० पासून पुतिन राष्ट्राध्यक्षपदी आहेत. २०३६ पर्यंत ते राष्ट्राध्यक्ष राहू शकतात. २०२० मध्ये त्यांनी घटना बदलून २ वेळा राष्ट्राध्यक्ष राहण्याची मर्यादा संपवून टाकली. ४ वेळा पुतीन जगातील सर्वांत शक्तिशाली व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

Web Title: World War III in One Step; After becoming president for the fifth time, Putin warned America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.