महिला लिफ्टमध्ये अडकली, 3 दिवस मदतीसाठी खूप ओरडली; अखेर गुदमरुन मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 18:53 IST2023-08-01T18:52:56+5:302023-08-01T18:53:30+5:30
अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने महिला लिफ्टमध्ये 9व्या मजल्यावर अडकली. तिचा आवाज कोणीही ऐकला नाही.

महिला लिफ्टमध्ये अडकली, 3 दिवस मदतीसाठी खूप ओरडली; अखेर गुदमरुन मृत्यू
इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लिफ्टमध्ये अडकल्यानंतर महिला मदतीसाठी ओरडली, रडली, पण तीन दिवस तिच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. अखेर वेदनेने लिफ्टमध्येच तिचा मृत्यू झाला. वीजपुरवठा खंडित झाल्याने लिफ्ट 9व्या मजल्यावर अडकली होती.
मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना ताश्कंद, उझबेकिस्तानचे आहे. तीन मुलांची आई असलेली 32 वर्षीय ओल्गा लिओनतेवा डिलिव्हरी ड्रायव्हर म्हणून काम करायची. गेल्या आठवड्यात ती एका इमारतीत सामान पोहोचवण्यासाठी गेली होती. इमारतीतील लिफ्ट खराब असल्याचे तिला माहीत नव्हते. ओल्गा लिफ्टमध्ये जाताच लिफ्ट जाम झाली आणि वीजही गेली.
वीज गेल्यामुळे 9व्या मजल्यावर असलेल्या लिफ्टचा दरवाजा लॉक झाला आणि त्यात ओल्गा अडकली. ती तीन दिवस लिफ्टमध्ये अडकून होती. यादरम्यान तिने मदतीसाठी खूप आरडाओरडा केला, पण तिचा आवाज बाहेर पोहोचला नाही. अखेर ओल्गाचा लिफ्टमध्येच मृत्यू झाला. तिकडे ओल्गा घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने ओल्गा ज्या इमारतीत सामान पोहोचवण्यासाठी गेली होती तिथे पोहोचले. शोध घेतल्यानंतर लिफ्टमधून तिचा मृतदेह सापडला. लिफ्टची अलार्म सिस्टीमही वीज खंडित झाल्याने बंद पडल्याचे तपासात समोर आले. 9व्या मजल्यावर अडकलेल्या ओल्गाचा आवाज कुणीही ऐकला नाही. अखेर गुदमरुन तिचा मृत्यू झाला.