तरुणीनं प्रियकराला दिली किडनी; ७ महिन्यांनंतर भलतंच घडलं, प्रेयसीला बसला जबर धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 13:38 IST2022-02-16T13:34:18+5:302022-02-16T13:38:54+5:30
तरुणीनं प्रियकराला दान केली किडनी; ७ महिन्यांनी प्रेयसीला बसला मानसिक धक्का

तरुणीनं प्रियकराला दिली किडनी; ७ महिन्यांनंतर भलतंच घडलं, प्रेयसीला बसला जबर धक्का
कॅलिफोर्नियामध्ये वास्तव्यास असलेली टिकटॉकर कॉलीन लीला तो दिवस आजही आठवतो. प्रियकराला वेदनेतून मुक्त करण्यासाठी कॉलीन रुग्णालयात ऑपरेशन थिएटरमध्ये झोपली होती. याआधी कधीच तिच्यावर इतकी मोठी शस्त्रक्रिया झाली नव्हती. आपल्यावर होणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे प्रियकराला नवं आयुष्य मिळेल याचा मनस्वी आनंद तिला होता. मात्र ज्याला किडनी देऊन नवं आयुष्य देतेय, तोच काही दिवसांत तिला सोडून जाईल याची कल्पनादेखील तिनं केली नव्हती.
प्रियकर सोडून गेला, त्यानं विश्वासघात केल्याचं दु:ख कॉलीनला नाही. आपण आपल्या प्रेमासाठी काहीतरी करू शकलो याचा तिला आनंदच आहे. ही गोष्ट २०२० मधील आहे. त्यावेळी कॉलीननं तिच्यासोबत घडलेला प्रकार संपूर्ण जगाला सांगितला. २०१६ मध्ये कॉलीननं तिची किडनी प्रियकराला दिली. मात्र पुढच्या काही महिन्यांत त्यानं विश्वासघात केला. तो असं काही करेल याचा विचारदेखील मी कधी केला नव्हता, असं कॉलीननं सांगितलं.
कॉलीननं सांगितल्यानुसार, २०१५ मध्ये नात्याची सुरुवात झाली. त्याआधीपासूनच प्रियकराला किडनीचा आजार होता. त्यामुळे कॉलीननं त्याला किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिनं चाचण्या केल्या. तिची किडनी जुळत असल्याचं समजताच मे २०१६ मध्य शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेच्या ७ महिन्यांनंतर कॉलीन एका मित्राच्या बॅचलर्स पार्टीसाठी लास वेगासला गेला होता. त्यानंतर तो कॅलिफोर्नियाला परतला. तेव्हा त्यानं विश्वासघाताची कबुली दिली.
प्रियकराचे शब्द ऐकून कॉलीनच्या पायाखालची जमीन सरकली. मात्र तरीही तिनं नातं संपवलं नाही. प्रियकर परत येईल अशी आशा तिला होती. मात्र ३ महिन्यांनंतर दोघांमध्ये फोनवरून वाद झाला. त्यानंतर प्रियकरानं फोन कट केला. कॉलीनचा नंबरही ब्लॉक केला. मात्र आपल्याला किडनी दान केल्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचं आता कॉलीननं सांगितलं. कोणाचा तरी जीव वाचवल्याचा आनंद वाटत असल्याची भावना तिनं बोलून दाखवली.