आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 15:48 IST2025-08-16T15:48:15+5:302025-08-16T15:48:42+5:30
ट्रम्प यांच्या या विधानानंतर, सेमीकंडक्टर उत्पादक कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत, त्यांची झोप उडली आहे...

आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
आगामी २ ते ३ आठवड्यात स्टील आणि सेमीकंडक्टरच्या आयातीवरही टॅरीफ लावले जाईल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर, सेमीकंडक्टर उत्पादक कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत, त्यांची झोप उडली आहे. हे दर सुरुवातीला कमी असतील, जेणेकरून कंपन्यांना अमेरिकेत उत्पादन करण्यासाठी वेळ आणि संधी मिळेल. यानंतर टॅरीफ वाढवले जाईल, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
असा आहे ट्रम्प प्लान ? -
ट्रम्प म्हणाले, आपल्या धोरणाचा मुख्य उद्देश, देशांतर्गत उत्पादन मजबूत करणे हा आहे. त्यांनी उदाहरण देत सांगितले की, ज्याप्रमाणे औषधांवरील टॅरीफ अथवा शुल्क आधी कमी आणि नंतर वाढवण्यात आले, तीच पद्धत स्टील आणि चिप्सच्या बाबतीतही वापरली जाईल. याच वेळी, जा कंपन्या अमेरिकेत उत्पादन करतील त्यांना यातून सूट मिळू शकते, असे संकेतही त्यांनी दिले.
ट्रम्प यांच्या निर्णयाचा जगावर काय परिणाम होणार? -
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आधीच जागतिक व्यापाराचे समीकरण बदलले आहे. त्यांनी फेब्रुवारी महिन्यात स्टील आणि अॅल्युमिनियमवरील टॅरीफ २५% पर्यंत वाढवला होता. यानंतर मे महिन्यात तो ५०% पर्यंत करण्याची घोषणा केली, जेणेकरून देशांतर्गत उत्पादकांना आणखी चालना मिळेल. आता सेमीकंडक्टर चिप्सवर १००% टॅरीफ लादण्याची योजना आहे. मात्र, ज्या कंपन्या अमेरिकेत गुंतवणूक करण्यास तयार आहेत, त्यांना यातून दिलासा दिला जाईल.