इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 10:58 IST2026-04-10T10:55:15+5:302026-04-10T10:58:00+5:30
इराण आणि अमेरिका यांच्यातील सीझफायर चर्चेसाठी इस्लामाबाद सज्ज. पाकिस्तानची मध्यस्थी तिसऱ्या महायुद्धाचा धोका टाळणार का?

इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
जग एका भीषण युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असताना, आता सर्वांच्या नजरा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादकडे लागल्या आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव निवळण्यासाठी आणि संभाव्य तिसरे महायुद्ध रोखण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला असून, शनिवारी होणारी ही सीझफायर चर्चा पाकिस्तानसाठी जागतिक स्तरावर आपली प्रतिमा सुधारण्याची सुवर्णसंधी मानली जात आहे. या ऐतिहासिक बैठकीसाठी इस्लामाबादमध्ये अभेद्य सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
राजधानीत दोन दिवसांची सुटी, हाय-प्रोफाइल हालचालींना वेग
या हाय-व्होल्टेज चर्चेच्या गांभीर्यामुळे इस्लामाबादमधील रेड झोन पूर्णपणे सील करण्यात आला आहे. राष्ट्रपती भवन, पंतप्रधान निवास आणि संसद भवन असलेल्या या परिसरात केवळ अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश दिला जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शहरात दोन दिवसांची सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. इराण आणि अमेरिकेच्या उच्चस्तरीय प्रतिनिधींमध्ये होणाऱ्या या चर्चेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संपूर्ण शहराला छावणीचे स्वरूप आले आहे.
VVIP प्रोटोकॉल आणि सुरक्षा दलांचा वेढा
दोन्ही देशांच्या प्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी 'ब्लू बुक'नुसार कडक प्रोटोकॉल लागू करण्यात आला आहे. पोलीस, निमलष्करी दले आणि विशेष सुरक्षा यंत्रणांना हाय-अलर्टवर ठेवण्यात आले आहे. प्रतिनिधींच्या प्रवासासाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करण्यात आले असून, या मार्गावर केवळ सुरक्षा दलांच्या ताफ्यालाच परवानगी असेल.
जेडी वेंस आणि अब्बास अराघची आमनेसामने
समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस हे आपल्या विशेष ताफ्यासह इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद-बाघेर गालिबफ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळही पाकिस्तानात पोहोचले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, या दोन्ही महासत्तांमधील ही बैठक निर्णायक ठरू शकते.
लेबनॉनवरील हल्ल्यांमुळे चर्चेवर टांगती तलवार?
एकीकडे चर्चेची तयारी सुरू असताना, इस्रायलने लेबनॉनवर केलेले हल्ले या शांतता प्रक्रियेत अडथळा ठरण्याची शक्यता आहे. इराणने आक्रमक पवित्रा घेत 'होर्मुज'ची सामुद्रधुनी पुन्हा बंद केली आहे. लेबनॉनवरील हल्ले थांबल्याशिवाय चर्चेला अर्थ नाही, अशी भूमिका इराणने घेतल्याने या बैठकीच्या यशाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. पाकिस्तानसह अनेक देशांनी लेबनॉनमधील हिंसाचाराचा निषेध केला आहे. आता पाकिस्तान या दोन्ही देशांना एकाच टेबलवर आणून युद्ध रोखण्यात यशस्वी होतो का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.