भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 14:37 IST2025-10-29T14:36:07+5:302025-10-29T14:37:01+5:30
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदर व्यक्त करत, दोन्ही देशांचे संबंध अत्यंत मजबूत असल्याचे सांगितले.

भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंध गेल्या काही महिन्यांपासून कमालीचे ताणले गेले आहेत.मात्र आता ते पुन्हा एकदा सुरळीत होण्याची शक्यता आहे. आपण भारतासोबत ट्रेड डील करणार आहोत, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. यामुळे या दोन्ही देशांत लवकरच मोठा व्यापार करार होऊ शकतो.
दक्षिण कोरियामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, आपण भारतासोबत लवकरच मोठा व्यापार करार करणार आहोत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदर व्यक्त करत, दोन्ही देशांचे संबंध अत्यंत मजबूत असल्याचे सांगितले. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार तणाव कमी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी, अमेरिका भारतावरील टॅरिफ (शुल्कात) १६ टक्क्यांपर्यंत कमी करण्यासंदर्भात विचार करत असल्याचे वृत्त होते. मात्र यासंदर्भात भारत अथवा अमेरिकेने कसल्याही प्रकारचे अधिकृत भाष्य केलले नाही.
गेल्या आठवड्यात, तीनपैकी दोन प्रमुख मुद्द्यांवर सहमती झाल्याचे वृत्त होते. दरम्यान, भारताने आपल्या कृषी बाजारात अमेरिकेच्या प्रवेशाला परवानगी दिली नव्हती, यामुळे दोन्ही देशांतील चर्चा थांबली होती. रशियाकडून तेल खरेदी कमी करण्याच्या भारताच्या तयारीनंतर अमेरिकेने टॅरिफ कपातीची तयारी दर्शवल्याची चर्चा होती.
'रशियन तेल खरेदीत पूर्ण कपात'चा दावा -
ट्रम्प यांनी शनिवारी दावा केला होता की, भारत रशियन तालीची खरेदी बंद करत आहे. भारत रशियन तेल खरेदी 'पूर्णपणे' बंद करत असून चीनही 'मोठ्या प्रमाणावर' कपात करेल, असे ट्रम्प म्हणाले होते. ते मलेशियाला जाताना विशेष विमान एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांसोबत बोलत होते.
तत्पूर्वी, अमेरिकेने भारतावर रशियन तेल खरेदीतून नफाखोरी आणि पुतिन यांना आर्थिक पाठबळ दिल्याचा आरोप करत २५% टॅरिफ लावला होता, नंतर २५% अतिरिक्त शुल्कही लावण्यात आले होते.