इराणमध्ये ट्रम्प करणार नवा कांड? सीक्रेट बैठकीतून खासदारांचा काढता पाय, रिपब्लिकन पक्षातच फूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 21:14 IST2026-03-27T20:38:04+5:302026-03-27T21:14:48+5:30
व्हाईट हाऊसच्या चार अधिकृत टार्गेटपैकी हे वेगळे आहे. ज्यामध्ये इराणची क्षेपणास्त्र, नौदल, प्रॉक्सी आणि अणु क्षमता नष्ट करण्याचा समावेश होता.

इराणमध्ये ट्रम्प करणार नवा कांड? सीक्रेट बैठकीतून खासदारांचा काढता पाय, रिपब्लिकन पक्षातच फूट
वॉशिंग्टन - इराणसोबतच्या शांतता चर्चेच्या नावाखाली ट्रम्प एक मोठा डाव खेळत आहेत. त्यांच्या या सीक्रेट प्लॅनिंगची झलक आढावा बैठकीच्या मध्यातूनच बाहेर पडलेल्या संतप्त खासदारांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. अमेरिकी संसदेतील एका गोपनीय बैठकीत मोठा गदारोळ झाल्याचा दावा केला जात आहे. ट्रम्प इराण युद्धाच्या हेतूबाबत देशाची दिशाभूल करत आहेत असा रिपब्लिकन खासदारांनी आरोप केला आहे. 'डेली मेल'च्या वृत्तानुसार बैठकीतील घडामोडी इतक्या धक्कादायक होत्या की खासदारांनी त्याला 'अविश्वसनीय' म्हटलं आहे.
"आमच्याशी खोटं बोललं गेलं"- रिपब्लिकन खासदार
ट्रम्प यांचे कट्टर समर्थक माईक रॉजर्स आणि आक्रमक नेत्या नॅन्सी मेस हे पत्रकार परिषदेतून संतापून बाहेर पडले. नॅन्सी मेस यांनी त्यांच्या सोशल मीडियावर लिहिले की, अमेरिकन जनतेला जे सांगितलं जात आहे आणि आम्हाला जी माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे भिन्न लष्करी उद्दिष्ट्ये आहेत. ट्रम्प इराणवर जमिनीवरील हल्ल्याची गुप्तपणे तयारी करत आहेत अशी खासदारांना भीती आहे असं त्यांनी सांगितले.
बैठकीतील एका सूत्राने दावा केला की, अणु ठिकाणे नष्ट करणे हे यापुढे त्यांचे प्राथमिक लष्करी उद्दिष्ट राहिलेले नाही असं खासदारांना सांगण्यात आले. व्हाईट हाऊसच्या चार अधिकृत टार्गेटपैकी हे वेगळे आहे. ज्यामध्ये इराणची क्षेपणास्त्र, नौदल, प्रॉक्सी आणि अणु क्षमता नष्ट करण्याचा समावेश होता. आता ट्रम्प सत्तापालटासाठी जोर देत आहेत.
खार्ग बेटावर ताबा
इराणच्या तेल निर्यातीपैकी ९०% वाटा असलेले खार्ग बेट, सध्या युद्धातील सर्वात मोठे संघर्षस्थळ बनले आहे. अमेरिका तिथे सैन्य उतरवण्याची योजना आखत आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने संपूर्ण बेटावर एंटी पर्सनल आणि एंटी आर्मर मॉइन्सचे जाळे पसरवले आहे. या जमिनीवरील कारवाईमुळे मोठ्या संख्येने अमेरिकन सैनिकांचा मृत्यू होऊ शकतो असा अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे.
दरम्यान, युद्ध लांबत चालल्याने ट्रम्प प्रशासन काँग्रेसकडे २०० अब्ज डॉलर्स (अंदाजे १६ लाख कोटी रुपये) इतक्या अतिरिक्त निधीची मागणी करण्याच्या तयारीत आहे. ही रक्कम पेंटागॉनच्या संपूर्ण वार्षिक अर्थसंकल्पाच्या एक-पंचमांश आहे. रिपब्लिकन खासदार आता या प्रचंड खर्चावर आणि अनिश्चित युद्धावर प्रश्न उपस्थित करत आहेत.