बचपन का प्यार...! नवऱ्याकडच्या अल्बममध्ये लहानपणीचा फोटो पाहून शॉक झाली पत्नी; माहितच नव्हते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 12:35 IST2022-08-06T12:34:43+5:302022-08-06T12:35:25+5:30
महिलेने एका तरुणाशी काही महिन्यापूर्वीच लग्न केले होते. लव्ह मॅरेज असले तरी ती त्याला फार आधीपासून ओळखत नव्हती.

बचपन का प्यार...! नवऱ्याकडच्या अल्बममध्ये लहानपणीचा फोटो पाहून शॉक झाली पत्नी; माहितच नव्हते...
भारतात काही महिन्यांपूर्वी 'जाने मेरी जाने मन, बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे' म्हणणारा मुलगा व्हायरल झाला होता. एवढा की पॉप सिंगर बादशाहला देखील त्याच्यासोबत गाणे काढण्याचा मोह आवरला नव्हता. या गाण्याची स्टोरी कदाचित इक्वाडोरमध्ये लिहिली गेली असेल. गंमत सोडली तर अशीच काहीशी एक घटना त्या देशात घडली आहे.
महिलेने एका तरुणाशी काही महिन्यापूर्वीच लग्न केले होते. लव्ह मॅरेज असले तरी ती त्याला फार आधीपासून ओळखत नव्हती. एके दिवशी ती नवऱ्याचे जुने अल्बम चाळत असताना अचानक त्याच्या लहानपणीच्या फोटोंमध्ये स्वत:चा फोटो पाहिला आणि शॉक झाली. ती आणि तिचा पती एकाच फ्रेममध्ये होते. तिला याची कल्पनाही नव्हती. ती तिच्या नवऱ्याला, तेव्हा तिच्यासाठी अनोळखी असलेल्या मुलाला पाहत होती.
एलिज मेलिना ही २६ वर्षीय महिला इक्वाडोरला राहते. हा फोटो १५ वर्षांपूर्वीचा आहे. या फोटोत दिसणारा मुलगा आता तिचा पती आहे. त्याचे नाव पेड्रो आहे. तेव्हा तिला हाच आपला पती होईल, याचा हासभारही नव्हता. एलिज तिच्या आईसोबत दरवर्षी शहरात होणाऱ्या परेडला जात असे, तेव्हाचा फोटो असल्याची तिने शक्यता व्यक्त केली.
ती १७ वर्षांची असताना पहिल्यांदा पेड्रोला भेटली होती. एका विद्यापिठाच्या बाहेर त्यांची भेट झाली होती. यानंतर दोन आठवड्यांनी पेट्रोने तिला प्रपोज केला होता. ६ वर्षे एकमेकांना डेट केल्यावर त्यांनी १० महिन्यांपूर्वी लग्न केले आहे. एलिजने सांगितले की, फोटो पाहून आम्हा दोघांनाही धक्का बसला, एकमेकांवर विश्वास बसत नव्हता. हा फोटो पाहून मनात अनेक भावना आल्या. हे अनेकांना अविश्वसनीय वाटेल, पण हे सत्य आहे. देवाने आम्ही एकत्र येण्याबाबत खूप आधीच लिहून ठेवले होते, आमचा यावर विश्वास आहे, असे ती म्हणाली.