ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 11:21 IST2025-08-04T11:20:13+5:302025-08-04T11:21:24+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इस्रायली मंत्र्याची प्रार्थना प्रक्षोभक आणि पूर्वनियोजित रणनीतीचा भाग असल्याचे म्हटले आहे.

ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले...
मध्य पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर, इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील पवित्र स्थळांवरून पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. इस्रायली मंत्री इत्मार बेन-गिविर यांनी यरुशलममधील अल-अक्सा मशीद परिसरात जाऊन प्रार्थना केल्याने मोठा वादंग निर्माण झाला आहे, ज्याचा पाकिस्तानसह अनेक मुस्लिम देशांनी तीव्र निषेध केला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, "पाकिस्तान अल-अक्सा मशिदीत इस्रायली मंत्र्यांनी केलेल्या कृत्यांचा तीव्र शब्दांत निषेध करतो. यात मंत्र्यांसोबत सॅटलर गट देखील सहभागी होते. इस्लामच्या सर्वात पवित्र स्थळांपैकी एक असलेल्या या ठिकाणाचे हे अपवित्रीकरण केवळ एक अब्जाहून अधिक मुस्लिमांच्या श्रद्धेचा अपमान नाही, तर आंतरराष्ट्रीय कायदा आणि मानवतेच्या सामूहिक सदसद्विवेकबुद्धीवरील थेट हल्ला आहे."
पाकिस्तानने इस्रायलबद्दल काय म्हटलं?
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इस्रायली मंत्र्याची प्रार्थना प्रक्षोभक आणि पूर्वनियोजित रणनीतीचा भाग असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, "इस्रायलने हे पद्धतशीरपणे आणि प्रक्षोभक पद्धतीने केले आहे, ज्यामुळे शांततेच्या शक्यतांना धोका निर्माण होत आहे. इस्रायलची ही कृती जाणूनबुजून पॅलेस्टाईन आणि व्यापक मध्य पूर्वेतील तणाव वाढवत आहे, ज्यामुळे मध्य पूर्व आणखी अस्थिरता आणि संघर्षाकडे ढकलले जात आहे."
शाहबाज शरीफ यांनी तात्काळ युद्धविराम, सर्व वाद मिटवणे आणि विश्वासार्ह शांतता प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची आपली मागणी पुन्हा उचलून धरली आहे. आंतरराष्ट्रीय कायदा आणि संबंधित संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार अल-कुद्स अल-शरीफला पॅलेस्टाईनची राजधानी बनवून स्वतंत्र देश स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली.
अरब संसदेकडूनही निंदा
पाकिस्तानव्यतिरिक्त अरब संसदेनेही इस्रायली मंत्र्यांच्या या भेटीचा निषेध केला आहे. या मशिदीत केवळ नमाज अदा केली जाते आणि येथे यहुद्यांना प्रार्थना करण्यास मनाई आहे. सध्या मशीद परिसर आणि आजूबाजूला इस्रायली सुरक्षा दल तैनात आहेत. तथापि, इस्रायली पंतप्रधानांच्या कार्यालयाने गिविर यांच्या भेटीनंतर स्पष्ट केले आहे की, पवित्र स्थळावरील कोणत्याही व्यवस्थेत बदल केला जाणार नाही. या घटनेमुळे मध्य पूर्वेतील परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.