पुतिन फक्त लँडलाइन का वापरतात? स्मार्टफोन टाळण्यामागे आहे भीती; हातही लावत नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 16:23 IST2025-12-04T16:09:40+5:302025-12-04T16:23:59+5:30
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आजपासून भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या सुरक्षेची चर्चा जोरदार सुरू आहे.

पुतिन फक्त लँडलाइन का वापरतात? स्मार्टफोन टाळण्यामागे आहे भीती; हातही लावत नाहीत
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दौन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. या भेटीदरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील, एका राजकीय मेजवानीला उपस्थित राहतील आणि भारत-रशिया विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतील. पण, त्यांच्या कडक सुरक्षेची चर्चा जोरदार सुरू आहे. पुतिन यांना मोबाईल वापरल्याचे कधी कोणी पाहिलेले नाही. क्रेमलिनमध्ये कोणाशीही बोलतात तेव्हा ते लँडलाइनचा वापर करतात. हे पण एक सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असल्याचे मानले जाते.
पुतिन यांच्याकडे स्मार्टफोन नाही. रशियन अध्यक्ष मोबाईल फोन वापरत नाहीत. २०१८ मध्ये शास्त्रज्ञ आणि तज्ञांसोबत झालेल्या बैठकीत, कुर्चाटोव्ह न्यूक्लियर रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रमुख मिखाईल कोवलचुक म्हणाले, "प्रत्येकाच्या खिशात स्मार्टफोन असतो." पुतिन यांनी उत्तर दिले, "तुम्ही म्हणालात की प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो. माझ्याकडे नाही."
पुतिन स्मार्टफोन का वापरत नाहीत?
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी एका रशियन टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत याची माहिती दिली. "माझ्या माहितीनुसार, पुतिनक यांच्याकडे फोन नाही. फोन वापरल्याने गोपनीयता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो आणि हा धोका एका उच्चपदस्थ नेत्यासाठी अत्यंत गंभीर असू शकतो.
पण काहींना वाटतं की खरं कारण फक्त सुरक्षिततेपेक्षा जास्त आहे. पुतिन यांनी TASS वृत्तसंस्थेला सांगितले की, क्रेमलिनमध्ये मोबाईल फोनवर पूर्णपणे बंदी आहे, म्हणूनच त्यांच्याकडे स्मार्टफोन नाही. ज्यावेळी आवश्यक असेल तेव्हाच ते अधिकृत सुरक्षित लाईनवर बोलतात.
त्यांना आधुनिक तंत्रज्ञानात फारसा रस नसल्याचे पुतिन यांनी अनेकदा सांगितले आहे. २०१७ मध्ये मुलांसोबत झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, ते "इंटरनेट खूप कमी वापरतात." त्यांनी इंटरनेटवर टीका केली आहे आणि त्याला "सीआयएचा विशेष प्रकल्प" म्हटले आहे. पुतिन यांनी वारंवार सांगितले आहे की इंटरनेट "अर्धे पोर्नोग्राफी आणि अर्धे धोकादायक सामग्री" ने भरलेले आहे, म्हणूनच ते टाळतात, असंही त्यांनी सांगितले.