इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 17:06 IST2025-09-03T17:02:45+5:302025-09-03T17:06:02+5:30

आतापर्यंत पोलीस आणि लष्करी कारवाईत ३ हजार १९५ जणांना अटक करण्यात आली. ठिकठिकाणी तपास पथक तैनात करण्यात आले आहे.

Why did thousands of women take to the streets in Indonesia, wearing pink clothes and carrying brooms? | इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?

इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?

इंडोनेशियात गेल्या आठवडाभरापासून देशव्यापी आंदोलन सुरू आहे. विशेषतः महिलांनी गुलाबी कपडे घालून आणि झाडू हातात धरून जकार्ता आणि इतर शहरांमध्ये निदर्शने केली आहेत. सुरुवातीला खासदारांच्या भरमसाठ भत्त्यांविरोधात हे आंदोलन सुरू झाले, पण आंदोलनात पोलिसांच्या दडपशाहीमुळे हिंसक वळण मिळाले. या आंदोलनात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून शेकडो जण जखमी झाले आहेत. 

२५ ऑगस्ट २०२५ रोजी जकार्तामधील संसदेजवळ आंदोलनाला सुरूवात झाली. इंडोनेशियातील खासदारांना दरमहा ३ हजार डॉलर भत्ता मिळतो. हा भत्ता किमान वेतनाच्या १० पट आहे. एकीकडे लोक वाढत्या महागाईमुळे, बेरोजगारीमुळे आर्थिक संकटात आहेत तर दुसरीकडे सरकारने अनेक योजनांमध्ये कपात करत भत्ते वाढवले आहेत त्यामुळे लोक रस्त्यावर उतरले. हे आंदोलन सुरू असताना २८ ऑगस्टला २१ वर्षीय टॅक्सी ड्रायव्हरचा मृत्यू झाला. पोलिसांच्या वाहनात त्याचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. पोलिसांनी अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडल्या त्यानंतर आंदोलन आणखी चिघळले. 

लोकांनी बेरोजगारी, महागाई, कर वाढ आणि विविध मुद्द्यांवरून सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उचलला आहे. विद्यार्थी संघटनांनी हॅशटॅग वापरत आंदोलनाला बळ दिले. महिला कार्यकर्त्यांनी पोलीस सुधारणा, महिलांवरील हिंसाचार थांबवणे यासारख्या मुद्द्यावर लक्ष वेधण्यासाठी हातात  झाडू धरून सरकारचा निषेध नोंदवला. जकार्तामध्ये सुरू असलेले आंदोलन हळूहळू इतर शहरांमध्ये पसरले. काही संतप्त आंदोलकांनी संसद भवन, पोलीस मुख्यालय परिसरात आग लावली. काही खासदारांच्या घरात घुसले. अर्थमंत्र्‍यांनाही टार्गेट करण्यात आले. आता सोशल मीडियावर #PinkProtest सारखे ट्रेंड सुरू झाला असून त्याला गुलाबी रंग वापरून लोकांचा पाठिंबा मिळत आहे. 

काय आहेत मागण्या?

  • खासदारांचे भत्ते आणि पगारवाढ रद्द करा
  • युवकाच्या मृत्यूला जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावा, संबंधित मृत्यूची चौकशी करण्यात यावी
  • नोकरदारांच्या किमान वेतनात वाढ करा, कराचा बोझा कमी करा. बेरोजगारीवर उपाययोजना आणि भ्रष्टाचारविरोधी कायदे कठोर करा

 

याशिवाय एकूण २५ मागण्या आंदोलकांकडून करण्यात आल्या आहेत. या आंदोलनाबाबत सुरुवातीपासून राष्ट्रपती प्रबोवे सुबियांतो यांच्या सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. आतापर्यंत पोलीस आणि लष्करी कारवाईत ३ हजार १९५ जणांना अटक करण्यात आली. ठिकठिकाणी तपास पथक तैनात करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची मुभा दिली आहे. तर पोलीस वाहन धडकेने मृत्यूमुखी पडलेल्या युवकाच्या प्रकरणात पोलीस प्रमुखाने माफी मागतली आहे. ७ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 
 

Web Title: Why did thousands of women take to the streets in Indonesia, wearing pink clothes and carrying brooms?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.