कोण होते अली लारीजानी? ज्यांच्या मृत्यूने इराणचे कंबरडे मोडले; मुलीला भेटायला गेले अन् घात झाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 08:41 IST2026-03-18T08:40:38+5:302026-03-18T08:41:29+5:30

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर आता इराणला दुसरा सर्वात मोठा धक्का बसला आहे.

Who was Ali Larijani? Whose death broke the back of Iran; He went to meet his daughter and was assassinated! | कोण होते अली लारीजानी? ज्यांच्या मृत्यूने इराणचे कंबरडे मोडले; मुलीला भेटायला गेले अन् घात झाला!

कोण होते अली लारीजानी? ज्यांच्या मृत्यूने इराणचे कंबरडे मोडले; मुलीला भेटायला गेले अन् घात झाला!

मध्यपूर्वेतील युद्ध आता अत्यंत भीषण वळणावर येऊन ठेपले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर आता इराणला दुसरा सर्वात मोठा धक्का बसला आहे. इराणचे सुरक्षा प्रमुख आणि सामरिक रणनीतीकार अली लारीजानी यांचा इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी या वृत्ताला दुजोरा दिला, तर इराणनेही जड अंतःकरणाने रात्री उशिरा या वृत्ताची पुष्टी केली. या घटनेमुळे इराणच्या लष्करी मोहिमांना मोठा खीळ बसल्याचे मानले जात आहे.

मुलीला भेटायला गेले अन् घात झाला!

मिळालेल्या माहितीनुसार, ६७ वर्षीय अली लारीजानी हे तेहरानच्या बाहेरील भागात आपल्या मुलीला भेटण्यासाठी गेले होते. याच वेळी इस्रायलने अचूक टप्पा गाठत त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात केवळ लारीजानीच नव्हे, तर त्यांचा मुलगा मोर्तेझा लारीजानी, त्यांच्या कार्यालयाचे प्रमुख अलीरेझा बायात आणि त्यांचे अंगरक्षकही मारले गेले आहेत. इराणच्या 'फार्स न्यूज एजन्सी'ने या घटनेचा सविस्तर तपशील दिला आहे.

इराणचा 'नंबर २' चा नेता हरपला

गेल्या महिन्यात अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचे सुपुत्र मोज्तबा खामेनेई यांची नवे नेते म्हणून निवड करण्यात आली. मात्र, लष्करी हालचाली आणि ऑपरेशनल निर्णयांमध्ये अली लारीजानी हेच खरे सूत्रधार होते. खामेनेई यांच्यानंतर लारीजानी हेच देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली नेते मानले जात होते. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स आणि लष्कराच्या प्रतिहल्ल्यांची पूर्ण जबाबदारी लारीजानी यांच्याच खांद्यावर होती.

राजकारणापासून तत्त्वज्ञानापर्यंत दबदबा

अली लारीजानी यांचा जन्म ३ जून १९५८ रोजी इराकच्या नजफमध्ये झाला होता. त्यांचे कुटुंब मूळचे इराणच्या आमोल भागातील होते. १९६१ मध्ये ते इराणला परतले. लारीजानी हे केवळ लष्करी रणनीतीकार नव्हते, तर ते एक प्रकांड पंडितही होते. त्यांनी 'शरीफ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी'मधून गणितात पदवी घेतली होती, ज्यात ते सुवर्णपदक विजेते होते. त्यानंतर त्यांनी पाश्चात्य तत्त्वज्ञानात एम.ए. आणि पीएचडी पूर्ण केली. विशेषतः जर्मन तत्त्ववेत्ता इमॅन्युएल कांट यांच्या विचारांवर त्यांनी सखोल संशोधन केले होते.

महत्त्वाच्या पदांचा प्रदीर्घ अनुभव

ऑगस्ट २०२५ मध्ये राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी लारीजानी यांची 'सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदे'च्या सचिवपदी नियुक्ती केली होती. यापूर्वी २००८ ते २०२० या काळात त्यांनी सलग तीन वेळा इराणच्या संसदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. अयातुल्ला खामेनेई यांचे ते अत्यंत विश्वासू सल्लागार होते. इराणच्या सत्तेच्या संरचनेची त्यांना इतकी खोलवर समज होती की, त्यांच्या निधनाने इराणमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Web Title: Who was Ali Larijani? Whose death broke the back of Iran; He went to meet his daughter and was assassinated!