पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात एका हिंदू मुलीनं इतिहास रचला आहे. याठिकाणी तिची असिस्टेंट कमिश्नर पदावर नियुक्ती झाली आहे. कशिश चौधरी ही अवघ्या २५ वर्षाची आहे. जी बलूचिस्तान इथली पहिली हिंदू महिला असिस्टेंट कमिश्नर बनली आहे. कशिशचं यश केवळ पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदू समुदायासाठी गर्वाची गोष्ट नाही तर तिथल्या हिंदू महिलांना शिक्षण आणि समाजातील त्यांच्या भागीदारीबाबत एक उत्तम उदाहरण आहे.
एजेंसीनुसार, कशिश चौधरीचा जन्म पाकिस्तानातील बलूचिस्तान प्रांतात छगई जिल्ह्यातील नॉशकी शहरात झाला. हा भाग अतिशय मागासलेला आणि वंचित आहे परंतु कशिशने इथून येत मिळवलेले यश शिक्षण क्षेत्रातील कामगिरी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. कशिश चौधरी बलूचिस्तान पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आणि तिची असिस्टेंट कमिश्नर पदावर निवड झाली. कशिश बलूचिस्तान प्रांतात लेडी हिरो म्हणून पुढे आली आहे.
कशिश चौधरी महिला आणि अल्पसंख्याक विकास, प्रांतातील सर्वांगिण प्रगती यादृष्टीने काम करतील असं बलूचिस्तानच्या मुख्यमंत्री सरफराज बगती यांनी म्हटलं तर महिलांना सशक्त बनवणे, त्यांना समान अधिकार मिळवून देणे यासाठी माझे प्राधान्य असेल असं कशिश चौधरी यांनी म्हटलं. बलूचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांनी कशिशच्या या विचारांचे कौतुक केले. केवळ बलूचिस्तानसाठी नाही तर देशाला कशिशचा अभिमान आहे. एका अल्पसंख्याक समुदायातून पुढे येत मेहनतीच्या बळावर ती उच्चपदावर पोहचली आहे असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, कशिशच्या यशावर तिच्या घरच्यांनी आनंद व्यक्त केला आहे. कशिशचे वडील गिरधारी लाल यांचं तिच्या यशात योगदान आहे. गिरधारी लाल हे मध्यमवर्गीय व्यापारी आहेत. त्यांनी नेहमीच मुलीला उच्चशिक्षणासाठी प्रवृत्त केले. आयुष्यात मोठं बनण्याचं स्वप्न कशिशचे होते, आज ती तिचं स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी झाली. हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. माझ्या मुलीने मेहनत घेतली आणि तिचं असिस्टेंट कमिश्नर बनण्याचं स्वप्न साकार केले असं तिचे वडील गिरधारी लाल यांनी माध्यमांना सांगितले.
हिंदू महिलांसाठी प्रेरणादायी
कशिश चौधरीचं यश पाकिस्तानातील हिंदू महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. मागील काही वर्षात पाकिस्तानात हिंदू समाजाच्या महिलांनी अनेक क्षेत्रात त्यांचा ठसा उमटवला आहे जिथे पारंपारिकपणे पुरुषांचे वर्चस्व मानले जात होते. मनीश रोपेटा हे त्याचे एक उदाहरण आहे, ज्या पाकिस्तानातील पहिली हिंदू महिला पोलीस सुप्रीटेंडेंट बनली. कराची पोलिस दलात त्यांनी उच्चपदावर कार्यभार सांभाळला. त्याशिवाय पुष्पा कुमारी कोहली, ज्या कराची पोलीस सब इन्स्पेक्टर आहे. सिंध पोलिस पब्लिक सर्व्हिस परीक्षेत त्यांनी यश मिळवले होते. आता कशिशच्या यशामुळे तिने बलूचिस्तान प्रांतातील अल्पसंख्याक समाजासाठी नवीन दिशा दिली आहे. हिंदू महिला केवळ शिक्षणात नाही तर सामाजिक, राजकीय क्षेत्रातही त्यांचे स्थान बनवत आहेत.