कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 16:45 IST2025-11-08T16:44:27+5:302025-11-08T16:45:23+5:30
या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या मुस्लिम आणि दक्षिण आशियाई महिला आहेत.

कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
न्यूयॉर्क - अमेरिकेतील दोन भारतीय वंशाच्या व्यक्ती गजाला हाशमी आणि जोहरान ममदानी यांच्या विजयाने अमेरिकन राजकारणात एक नवीन पाया रचला आहेच, शिवाय भारतातही अभिमानाची भावना निर्माण केली आहे. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या कठोर परिश्रम आणि तत्त्वांनी अमेरिकन जनतेची मने जिंकली आहेत. ६१ वर्षीय गजाला हाशमी यांनी व्हर्जिनियामध्ये लेफ्टनंट गव्हर्नर पदावर विजय मिळवून इतिहास रचला आहे. या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या मुस्लिम आणि दक्षिण आशियाई महिला आहेत. त्यांनी रिपब्लिकन उमेदवार जॉन रीड यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. ४ नोव्हेंबरच्या निवडणुकीनंतर निकाल जाहीर होताच सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात अभिनंदनाचा वर्षाव झाला.
हैदराबाद ते अमेरिकेचा प्रवास
गजाला यांचा जन्म १९६४ मध्ये हैदराबाद येथे झाला. त्यांचे वडील तनवीर हाशमी आणि आई झिया हाशमी हे शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. गजाला वयाच्या चौथ्या वर्षी कुटुंबासह अमेरिकेत गेल्या. त्यांचे सुरुवातीचे वर्ष हैदराबादमधील मलकपेट येथे गेले. त्यावेळी त्यांचे वडील अमेरिकेतील जॉर्जिया विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पीएचडी करत होते.
अलीगढ मुस्लिम विद्यापीठाशी संबंध
तनवीर हाशमी यांचं अलीगढ मुस्लिम विद्यापीठ (एएमयू) शी घनिष्ट संबंध आहेत. त्यांनी तेथून एमए आणि एलएलबी पूर्ण केले. नंतर ते विद्यापीठात शिकवण्यासाठी अमेरिकेत गेले आणि नंतर आंतरराष्ट्रीय शिक्षण केंद्राची स्थापना केली, जिथून ते संचालक म्हणून निवृत्त झाले.
गजालांचे शिक्षण आणि कुटुंब
गजाला यांनी जॉर्जिया सदर्न विद्यापीठातून बीए आणि अटलांटाच्या एमोरी विद्यापीठातून अमेरिकन साहित्यात पीएचडी केली. त्यांचे लग्न अझहर रफिक यांच्याशी झाले. आणि त्यांना दोन मुली आहेत. १९९१ मध्ये त्या रिचमंड येथे स्थायिक झाल्या, जिथे त्या जवळजवळ ३० वर्षे प्राध्यापक म्हणून शिकवत होत्या.
राजकारणात प्रवेश आणि यशोगाथा
गजाला हाशमी यांचा राजकीय प्रवास २०१९ मध्ये सुरू झाला जेव्हा त्यांनी रिपब्लिकन उमेदवाराला पराभूत केले आणि अनेक वर्षांनी व्हर्जिनिया सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला बहुमत मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे आणि शिक्षण क्षेत्राची सखोल समज यामुळे त्यांची लोकप्रियता हळूहळू वाढत गेली.
गजाला सिनेट सदस्य बनल्या
गजाला यांचा प्रभाव आणि नेतृत्व कौशल्य पाहता २०२४ मध्ये त्यांना सिनेट शिक्षण आणि आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. त्यांचा ऐतिहासिक विजय केवळ अमेरिकेतील अल्पसंख्याक आणि स्थलांतरित समुदायासाठी प्रेरणादायी नाही तर भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे. गजाला यांच्या यशाबद्दल हैदराबादपासून अलीगढपर्यंत जल्लोष उसळला आहे. सोशल मीडियावर लोक तिला "अमेरिकेत इतिहास घडवणारी भारताची कन्या" म्हणून गौरवत आहेत.