कोण आहेत 'या' २ अमेरिकन महिला खासदार?; ज्यांनी नरेंद्र मोदींच्या भाषणावर टाकला बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 17:42 IST2023-06-22T17:00:00+5:302023-06-22T17:42:19+5:30
मागील वर्षी ती पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी पाकव्याप्त काश्मीरातही ती पोहचली. भारताने इल्हान उमरच्या या दौऱ्याचा कडक शब्दात निषेध केला होता

कोण आहेत 'या' २ अमेरिकन महिला खासदार?; ज्यांनी नरेंद्र मोदींच्या भाषणावर टाकला बहिष्कार
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. याठिकाणी मोदी अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भाषणावर अमेरिकेतील २ महिला खासदारांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. इल्हान उमर आणि रशिदा तलैब या २ महिला खासदारांनी भारतात अल्पसंख्याकांवर अन्यात होत असल्याचा आरोप केला आहे.
कोण आहे इल्हान उमर?
इल्हानचा जन्म सोमालियात झाला, सोमालियात अंतर्गत युद्धामुळे त्यांच्या कुटुंबाने केनियाच्या शरणार्थी कॅम्पमध्ये आश्रय घेतला. त्यावेळी इल्हान ८ वर्षाची होती. जवळपास ४ वर्ष या कॅम्पमध्ये राहिल्यानंतर १९९० मध्ये तिचे कुटुंब अमेरिकेला गेले. अमेरिकेत इल्हानने राजकीय करिअर सुरू केले. २०१६ मध्ये इल्हान उमर निवडणुकीत विजयी होऊन मिनिसोटाचे प्रतिनिधित्व केले. २०१९ मध्ये इल्हान मिनिसोटाहून खासदार म्हणून निवडून आली. अमेरिकन काँग्रेस सदस्य असलेली इल्हान उमर पहिली आफ्रकिन शरणार्थी आहे. अमेरिकेत खासदार होणाऱ्या २ मुस्लीम महिलांमध्ये इल्हानचा समावेश आहे.
रशिदा तलैब कोण आहे?
रशिदा तलैब या मिशिगन येथील खासदार आहेत. फिलिस्तानी मूळ असलेल्या आई वडिलांच्या १४ मुलांमध्ये रशिदा सर्वात मोठी होती. मिशिगनच्या डेट्रॉईट शहरात तिचा जन्म झाला. २००८ मध्ये मिशिगन प्रतिनिधी म्हणून तिला निवडण्यात आले. मिशिगनमध्ये निवडून आलेली ती पहिली महिला खासदार आहे.
पंतप्रधान मोदींवर लावले आरोप
इल्हान उमरने ट्विट करत म्हटलं की, पंतप्रधान मोदी सरकारकडून धार्मिक अल्पसंख्याकांवर दबाव आणला जातो. त्यामुळे हिंदू समुहाला प्रोत्साहन मिळते. मी मोदींच्या भाषणात सहभागी होणार नाही. तर मोदींना आपल्या राष्ट्राचे व्यासपीठ मिळतेय हे लज्जास्पद आहे. त्यांचा मानवाधिकार उल्लंघनाचा मोठा इतिहास आहे. मुस्लीम आणि अल्पसंख्याकांना टार्गेट करणे चुकीचे आहे. मी मोदींच्या भाषणावर बहिष्कार टाकते असं खासदार रशिदा तलैब यांनी म्हटलं.
इल्हान उमरने याआधीही भारताविरोधी केले विधान
मागील वर्षी एप्रिल महिन्यात इल्हान उमरने अमेरिकन संसदेत म्हटलं होते की, अखेर मोदी सरकार मुस्लिमांविरोधात आणखी काय काय अत्याचार करणार त्यानंतर बायडन प्रशासन त्यावर बोलणार. अमेरिकन संसदेत भारताविरोधात इल्हान उमरने प्रस्तावही आणला होता. ज्या देशात धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन केले जाते अशा देशांच्या यादीत भारताचे नाव टाकावे असं इल्हान उमरने मागणी केली होती. इल्हान उमर ही भारतविरोधी म्हणून ओळखली जाते.
मागील वर्षी ती पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी पाकव्याप्त काश्मीरातही ती पोहचली. भारताने इल्हान उमरच्या या दौऱ्याचा कडक शब्दात निषेध केला होता. त्यानंतर बायडन प्रशासनाला स्पष्टीकरण द्यावे लागले होते. इमरान सरकार अमेरिकेवर त्यांचे सरकार पाडल्याचा आरोप करत होती त्यावेळीच इल्हान उमर पाकिस्तानात गेली होती. भारतासोबत इल्हान इस्त्राईलचाही विरोध करते. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय प्रकरणातील समितीतून त्यांना हटवण्यात आले.