जिथे वाद, तिथेच बसून सलोख्याच्या गप्पा! झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात युद्धाबाबत दीर्घकाळ चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 10:25 IST2025-08-20T10:24:29+5:302025-08-20T10:25:43+5:30
ज्या ठिकाणी ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात वाद झाले होते, त्याच व्हाइटहाऊसमध्ये दोघांमध्ये सलोख्याच्या गप्पा झाल्या.

जिथे वाद, तिथेच बसून सलोख्याच्या गप्पा! झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात युद्धाबाबत दीर्घकाळ चर्चा
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्ध समाप्तीसाठी व्लादिमिर पुतिन आणि वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात आमने-सामने चर्चा घडवून आणण्याची तयारी सुरू केली आहे. यासोबतच रशियाच्या अनुषंगाने युरोपच्या सुरक्षिततेविषयक हमीचे अमेरिका समर्थन करेल, अशी ग्वाही ट्रम्प यांनी दिली आहे. ज्या ठिकाणी ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात वाद झाले होते, त्याच व्हाइटहाऊसमध्ये दोघांमध्ये सलोख्याच्या गप्पा झाल्या.
या चर्चेच्या माध्यमातून युद्ध थांबवण्यासोबतच रशियाला पुन्हा युक्रेनवर आक्रमण करण्यापासून रोखणे, हा युरोपच्या सुरक्षाविषयक हमीमागील उद्देश आहे. परंतु, या योजनेबाबत ट्रम्प यांनी सविस्तर काहीही सांगितलेले नाही.
सोमवारी व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात दीर्घ बैठक झाली. युरोपीयन देशांचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते. ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारकाळात रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याचे आश्वासन दिले होते. झेलेन्स्की यांच्याशी चर्चेनंतर आता या दिशेने वेगाने पावले उचलली जाऊ शकतील, असे युरोपीय देशांच्या नेत्यांनी म्हटले आहे.
युरोपीन देशांच्या सुरक्षेची हमी देण्याच्या दृष्टीने ट्रम्प यांनी कटिबद्धता व्यक्त करणे, हे या बैठकीचे सकारात्मक फलित असल्याचे फ्रान्सचे राष्ट्रपती इम्पॅन्यूएल मॅक्रों यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पुतिन यांच्याशीही चर्चा
ट्रम्प यांनी झेलेन्स्की - पुतिन यांच्यातील बैठकीसाठी प्राधान्याने प्रयत्न करण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. सोमवारी त्यांनी झेलेन्स्की, ब्रिटन, फिनलैंड, फ्रान्स, जर्मनी आणि इटलीच्या नेत्यांसह युरोपीयन आयोगाचे अध्यक्ष तसेच 'नाटो'च्या अध्यक्षांशी चर्चा केली होती. यानंतर त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा केली.
बैठकीचे स्थळ लवकरच ठरवणार
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की, पुतिन यांच्यातील ही नियोजित बैठक नेमकी कुठे आयोजित करायची, यासाठी तयारी सुरू असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ही बैठक झाल्यानंतर स्वतः ट्रम्प या दोन्ही नेत्यांसोबत चर्चा करतील.