युक्रेनच्या 'ऑपरेशन स्पायडरवेब'ला कधी अन् कसं प्रत्युत्तर देणार?; रशियाने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 19:04 IST2025-06-05T19:03:15+5:302025-06-05T19:04:29+5:30
मागील आठवड्यात युक्रेनने ऑपरेशन स्पायडरवेब हाती घेत रशियाविरोधात मोठा ड्रोन हल्ला केला.

युक्रेनच्या 'ऑपरेशन स्पायडरवेब'ला कधी अन् कसं प्रत्युत्तर देणार?; रशियाने केला खुलासा
नुकतेच ऑपरेशन स्पायडरवेब अंतर्गत युक्रेनने रशियाच्या एअरबेसला टार्गेट केले. या हल्ल्यात रशियाच्या ४० लढाऊ विमानांचे मोठे नुकसान झाले. गेल्या ३ वर्षातील रशिया-युक्रेन युद्धात रशियावर झालेला हा सर्वात मोठा हल्ला होता. या हल्ल्यानंतर रशिया-युक्रेन यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे. त्यात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्यासोबत जवळपास ७५ मिनिटे चर्चा केली. रशियाने युक्रेनच्या हल्ल्याला कसं उत्तर द्यायचे आणि कधी द्यायचे हे त्यांचे सैन्य ठरवेल असं स्पष्ट सांगितले आहे.
मागील आठवड्यात युक्रेनने ऑपरेशन स्पायडरवेब हाती घेत रशियाविरोधात मोठा ड्रोन हल्ला केला. त्या ऑपरेशनमध्ये रशियन सैन्याचे एअरबेस आणि विमानांना टार्गेट करण्यात आले होते. बुधवारी डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादीमीर पुतिन यांच्यात फोनवरून संवाद झाला. त्यात रशियाने स्पष्ट सांगितले की, रशिया युक्रेनच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देईल. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनीही सोशल मीडियावर पुतिन यांच्याशी झालेल्या संवादात हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देणार असल्याचे सांगितले आहे.
संवाद चांगला झाला, पण...
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिलंय की, पुतिन यांच्यासोबत जवळपास १ तास १५ मिनिटे चर्चा झाली. आम्ही युक्रेनकडून रशियाच्या एअरबेसवर केलेला हल्ला, दोन्ही बाजूने सुरू असलेले विविध हल्ले यांच्यावर चर्चा केली. ही एक चांगली चर्चा झाली परंतु ज्यातून शांतता निर्माण होईल असं काही चर्चा नाही. एअरबेसवर झालेल्या अलिकडच्या हल्ल्यांना रशियाला प्रत्युत्तर द्यावे लागेल असं राष्ट्रपती पुतिन यांनी सांगितल्याचे ट्रम्प म्हणाले.
'ऑपरेशन स्पायडरवेब'वर रशिया काय बोलले?
दरम्यान, आमच्या सैन्याला योग्य वाटेल तेव्हा हा हल्ला केला जाईल असं रशियाने सांगितले. रशियासोबत युद्धावेळा युक्रेनकडून ऑपरेशन स्पायडरवेब करत ड्रोन हल्ले करण्यात आले. १ जून रोजी मोठ्या संख्येने ड्रोन हल्ले केल्याचे युक्रेनने कबुल केले. रशियात केलेल्या या ड्रोन हल्ल्यात प्रमुख एअरबेस आणि विमानांना टार्गेट करण्यात आले. हल्ल्यात ४० हून अधिक विमाने जळून खाक झाली ज्याचा वापर युक्रेनविरोधात हल्ल्यासाठी केला जात होता.