भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:44 IST2025-08-08T16:43:23+5:302025-08-08T16:44:15+5:30
Death of Indians in Canada: कॅनडामध्ये भारतीयांच्या मृत्युची संख्या सातत्याने वाढत आहे.

भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
कॅनडामध्ये भारतीयांच्या मृत्युची संख्या सातत्याने वाढत आहे. सरकारने गुरुवारी संसदेत सांगितले की, गेल्या पाच वर्षांत कॅनडामध्ये १००० हून अधिक भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतेक मृत्यू हे वृद्धापकाळ किंवा आजारपणासारख्या नैसर्गिक कारणांमुळे झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने सरकारने कॅनडाहून ७५७ भारतीयांचे मृतदेह भारतात आणले, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी दिली.
परराष्ट्र मंत्रालयाला गेल्या पाच वर्षांत कॅनडामध्ये मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकांच्या मृत्यूच्या कारणांबद्दल विचारण्यात आले. यावर स्पष्टीकरण देताना कीर्ती वर्धन सिंह यांनी संसदेत सांगितले की, "मंत्रालयाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, २०२० ते २०२४ दरम्यान कॅनडामध्ये एकूण १ हजार २०३ भारतीयांचा मृत्यू झाला. यापैकी बहुतेक मृत्यू हे वृद्धत्व आणि गंभीर आजारामुळे झाले. शिवाय, अपघात, हिंसाचार, हत्या आणि आत्महत्या यांसारख्या अनैसर्गिक कारणांमुळे अनेक मृत्यू झाल्याची माहिती आहे."
कीर्ती वर्धन सिंह पुढे म्हणाले की, कॅनडामध्ये भारतीयांच्या मृत्युची संख्या दरवर्षी वाढत आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, कॅनडात २०२० मध्ये १२० भारतीयांचा मृत्यू झाला आहे. तर, २०२१ मध्ये १६०, २०२२ मध्ये १९८, २०२३ मध्ये ३३६ आणि २०२४ मध्ये ३८९ लोकांचा मृत्यू झाला आहे. भारत सरकार भारतीय नागरिकांच्या मृतदेहांच्या वाहतुकीशी संबंधित समस्यांना गांभीर्याने घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडे एक विशिष्ट मानक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेअंतर्गत, सर्व भारतीय दूतावास आणि केंद्र सरकार परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या समस्यांसाठी एकत्र काम करतात, अशी माहिती कीर्ती वर्धन सिंह यांनी दिली. या प्रक्रियेत मृत्यू, स्थानिक पातळीवर अंत्यसंस्कार किंवा दफनविधीची व्यवस्था करणे, मृतदेह भारतात त्यांच्या कुटुंबाकडे पोहोचवणे यांचा समावेश आहे.