ही कसली युद्धबंदी...! युक्रेन-रशियामध्ये युद्ध सुरुच राहणार, पण...; ट्रम्प-पुतीन यांच्यात फोनवर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 09:32 IST2025-03-19T09:32:15+5:302025-03-19T09:32:41+5:30
Ukraine Russia ceasefire : ट्रम्प आणि पुतीन यांच्यामध्ये मंगळवारी फोनवर चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी व्हाईट हाऊसमध्ये युक्रेनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात मीडियासमोर बाचाबाची झाली होती.

ही कसली युद्धबंदी...! युक्रेन-रशियामध्ये युद्ध सुरुच राहणार, पण...; ट्रम्प-पुतीन यांच्यात फोनवर चर्चा
रशिया आणि युक्रेनमध्ये आंशिक युद्धबंदीवर सहमती बनली आहे. याद्वारे रशिया युद्ध थांबविणार नाही परंतू युक्रेनच्या ऊर्जा आणि पायाभूत सुविधांवर हल्ला करणार नाहीय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात झालेल्या फोन कॉलनंतर ही अजब युद्धबंदीचा समझोत्यावर सहमती बनविण्यात आली आहे.
ट्रम्प आणि पुतीन यांच्यामध्ये मंगळवारी फोनवर चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी व्हाईट हाऊसमध्ये युक्रेनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात मीडियासमोर बाचाबाची झाली होती. तेव्हा ट्रम्प यांनी युक्रेनला अमेरिकेने हात काढला तर कोणी वाचवू शकत नाही, असे सुनावत दुर्मिळ खनिजे अमेरिकेला सोपविण्यास सांगितले होते. यास झेलेन्स्की यांनी नकार दिला होता. तसेच रशिया हल्ले करणार नाही याची हमी कोण देईल असेही विचारले होते. परंतू, झेलेन्स्की यांच्यावर दबाव वाढला होता.
आता देखील युक्रेनला काहीच दिलासा मिळालेला नाही. ट्रम्प आणि पुतीन यांच्यात दोन तास चर्चा झाली. यामध्ये युक्रेन सहमत झालेल्या एक महिन्याच्या युद्धबंदीच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला पुतीन यांनी थेट नकार दिला. हा प्रस्ताव फेटाळताच अमेरिकेने युक्रेनच्या ऊर्जा आणि पायाभूत सुविधांवर हल्ला न करण्याचा प्रस्ताव मांडला. यावर पुतीन राजी झाले आहेत.
पुतीन यांनी युद्धबंदीचा प्रस्ताव झिडकारल्यानंतर व्हाईट हाऊसने लगेचच निवेदन जारी केले. यामध्ये युक्रेनच्या ऊर्जा आणि पायाभूत सुविधांवर हल्ला न करण्यावर सहमती बनली हे शांततेच्या दिशेने पहिले पाऊल असल्याचे म्हटले आहे. आम्ही संपूर्ण युद्धबंदी आणण्यासाठी आणि शेवटी हे भयानक रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी जलदगतीने काम करू, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तर रशियानेही या मर्यादित युद्धबंदीची माहिती दिली आहे.
नाटोला आपल्या देशापासून दूर ठेवण्यासाठी रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. या चर्चेत रशियाने युद्धबंदीचे प्रभावी नियंत्रण, युक्रेनमधील सक्तीची सैन्य भरती थांबवणे आणि युक्रेनियन सैन्याला पुन्हा शस्त्रसज्ज करण्याबाबतच्या मुद्द्यांवर जोर दिला होता. तसेच रशियाला नाटोपासून असलेल्या धोक्याबाबत कायमस्वरुपी तोडगा हवा होता.संघर्षाची मूळ कारणे दूर करण्याची आणि सुरक्षेच्या क्षेत्रात रशियाचे कायदेशीर हितसंबंध लक्षात घेण्याची गरज आहे, असे क्रेमलीनने म्हटले आहे.