उच्चभ्रूंसाठी मुलींची तस्करी, खासगी बेट अन्... ट्रम्प यांचे नाव आलेलं एपस्टाईन फाइल्स प्रकरण काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 15:07 IST2025-06-06T15:02:03+5:302025-06-06T15:07:37+5:30

इलॉन मस्क यांनी जेफ्री एपस्टाईन याचे नाव घेऊन अमेरिकेत खळबळ उडवून दिली आहे.

What is the Epstein Files case that Donald Trump name comes up in | उच्चभ्रूंसाठी मुलींची तस्करी, खासगी बेट अन्... ट्रम्प यांचे नाव आलेलं एपस्टाईन फाइल्स प्रकरण काय आहे?

उच्चभ्रूंसाठी मुलींची तस्करी, खासगी बेट अन्... ट्रम्प यांचे नाव आलेलं एपस्टाईन फाइल्स प्रकरण काय आहे?

Jeffrey Epstein Files: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती इलॉन मस्क यांच्यातील मैत्री जवळजवळ संपली आहे. गेल्या काही दिवसांत दोघांमध्ये सुरु झालेलं शाब्दिक युद्ध आता राजकीय वादळ निर्माण करत आहे. 'वन बिग ब्युटीफुल बिल' पासून सुरू झालेला वाद आता सरकारी करार रद्द करण्याची धमकी आणि सरकारी धोरणांवर टीका करण्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या संघर्षानंतर मस्क यांनी एक मोठा आरोप करत त्यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका केली आहे. एपस्टाईन फाइल्सचा उल्लेख करत मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर निशाणा साधल्यानंतर जगभरात नेमकं हे प्रकरण काय होतं अशी चर्चा सुरु झालीय.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यात इतकी कटुता निर्माण झालीय की मस्क यांनी त्यांच्या मित्राच्या तारुण्यातील गुपिते सार्वजनिक करण्यास सुरुवात केली आहे. एपस्टाईन फाइल्स प्रकरण काढत त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचेही नाव होते असा आरोप इलॉन मस्क यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव जेफ्री एपस्टाईन यांच्या सीलबंद फायलींमध्ये आहे. त्यामुळेच या फायली सार्वजनिक करण्यात आल्या नाहीत असं मस्क म्हणाले. जेफ्री एपस्टाईन याच्याबद्दल बोलून मस्क यांनी अमेरिकन राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

जेफ्री एपस्टाईन वाद काय आहे?

जेफ्री एपस्टाईन हा एक अमेरिकन व्यापारी आणि अमेरिकन अब्जाधीश फायनान्सरही होता. २०१९ मध्ये त्याच्यावर तस्करी आणि अल्पवयीन मुलींच्या शोषणाचे गंभीर आरोप लावण्यात आले होते. या  जेव्हा व्हर्जिनिया गिफ्रे नावाच्या महिलेने पुढे येऊन अनेक खुलासे केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. ग्रिफने सांगितले की, एपस्टाईन आणि त्याची सहकारी घिसलेन मॅक्सवेल यांनी १९९९ ते २००२ दरम्यान तिला अनेक लोकांकडे पाठवले होते. यामध्ये ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू आणि फ्रेंच मॉडेलिंग एजंट जीन-ल्यूक ब्रुनेल यांचा समावेश होता. २०१९ मध्ये एपस्टाईनला अटक करण्यात आली आणि तुरुंगातच त्याचा मृत्यू झाला. त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. २००२ ते २००५ दरम्यान न्यू यॉर्क आणि फ्लोरिडा येथील त्याच्या घरांमध्ये एपस्टाईनवर अनेक अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता.

जेफ्री एपस्टाईने त्याच्या अफाट संपत्तीच्या जोरावर जगातील श्रीमंत आणि हाय प्रोफाईल लोकांशी संबंध निर्माण केले. एपस्टाईनच्या संबंधित लोकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचेही नाव होते. २००५ मध्ये एका १४ वर्षांच्या मुलीने अत्याचाराची तक्रार केल्यानंतर त्या चौकशी सुरू करण्यात आली. त्यावेळी ३६ अल्पवयीन पीडितांचे शोषण झाल्याचे समोर आलं. २००८ मध्ये त्याला वेश्याव्यवसायाशी संबंधित दोन आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आले आणि १३ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

जेफ्री एपस्टाईनकडे अफाट संपत्ती होती. त्याने अमेरिकेत खाजगी बेट आणि जेट खरेदी केले होते. अमेरिकेतील हाय  प्रोफाईल लोक या जेटने त्याच्या खाजगी बेटावर पोहोचायचे. एपस्टाईन अमेरिकेच्या व्हर्जिन आयलंडमधील लिटिल सेंट जेम्स या बेटावर सेलिब्रिटींचे मनोरंजन करण्यासाठी प्रसिद्ध होता. तो अनेकदा लोकांना त्याच्या बेटावर घेऊन जायचा आणि तिथे भेट देणाऱ्यांची लेखी नोंद ठेवायचा. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष एपस्टाईनच्या विमानाने सात वेळा प्रवास केल्याचे समोर आलं होतं. एपस्टाईन अल्पवयीन मुलींना चुकीच्या कामांसाठी बेटावर आलेल्या हाय प्रोफाइल लोकांकडे पाठवत होता.

जुलै २०१९ मध्ये जेफ्री एपस्टाईनला अटक झाल्यानंतर खटला सुरू असताना तुरुंगातच त्याचा मृत्यू झाला. यामुळे त्याच्याशी संबंधित असलेल्यांविरुद्धची सर्व  कारवाई थांबवण्यात आली. एपस्टाईनशी संबंधित काही फायली या वर्षी सार्वजनिक करण्यात आल्या. त्यामध्ये अनेक महत्त्वाची माहिती आणि हाय प्रोफाइल संपर्कांचा उल्लेख होता. मात्र यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव नव्हते.

Web Title: What is the Epstein Files case that Donald Trump name comes up in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.