काय आहे अल कादिर ट्रस्ट प्रकरण, ज्यात इम्रान खान यांना सुनावली 14 वर्षांची शिक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 16:39 IST2025-01-17T16:38:48+5:302025-01-17T16:39:14+5:30

Al Qadir Trust case: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षांची शिक्षा झाली आहे.

What is the Al Qadir Trust case, in which Imran Khan was sentenced to 14 years in prison? | काय आहे अल कादिर ट्रस्ट प्रकरण, ज्यात इम्रान खान यांना सुनावली 14 वर्षांची शिक्षा?

काय आहे अल कादिर ट्रस्ट प्रकरण, ज्यात इम्रान खान यांना सुनावली 14 वर्षांची शिक्षा?

Al Qadir Trust case:पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना अल कादिर ट्रस्ट प्रकरणात(भ्रष्टाचार प्रकरणा) 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर, त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना 7 वर्षे तुरुंगात काढावे लागणार आहेत. खान यांच्यावर सत्तेत असताना सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. तसेच, अल-कादिर युनिव्हर्सिटी ट्रस्ट स्थापन करण्याच्या बदल्यात देशाच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे.

इम्रान खान यांना शिक्षेव्यतिरिक्त 10 लाख रुपये आणि त्यांच्या पत्नीला 5 लाख रुपये दंड भरावा लागणार आहे. दरम्यान, इम्रान खानला याच प्रकरणाच मे 2023 मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. आता आज अखेर त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

काय आहे अल कादिर ट्रस्ट प्रकरण?
मोठमोठी आश्वासने देत इम्रान खान पाकिस्तानात सत्तेवर आले. पाकिस्तानी जनतेची लुटलेली संपत्ती परत आणू, असे ते आपल्या सभांमध्ये सांगायचे. यातील बहुतांश संपत्ती शरीफ आणि झरदारी कुटुंबियांनी परदेशात नेल्याचा आरोप खान वारंवार करायचे. पुढे इम्रान खान पंतप्रधान झाले, पण त्यांनी आपले आश्वासन पाळले नाही. 

2018 मध्ये ब्रिटनच्या नॅशनल क्राईम एजन्सीने पाकिस्तानातील मोठा जमीन व्यावसायिक मलिक रियाझची मालमत्ता जप्त केली होती. रियाझवर त्याच्या व्यवसायात अनियमितता केल्याचा आरोप होता. जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत सुमारे 50 अब्ज पाकिस्तानी रुपये आहे. ब्रिटिश सरकारने पाकिस्तान सरकारला पैशाचा योग्य वापर करण्यास सांगितले. खान, हे पैसे स्टेट बँक ऑफ पाकिस्तानमध्ये जमा करून लोकांच्या सेवेसाठी वापरतील, अशी अपेक्षा होती. पण असे झाले नाही. असे म्हटले जाते की, खान यांच्या मंत्रिमंडळाने एक युक्ती शोधून काढली ज्याद्वारे पैसा पाकिस्तानात आला, परंतु थोड्या वेगळ्या मार्गाने.

ब्रिटन आणि पाकिस्तानमध्ये 50 अब्ज रुपयांबाबत चर्चा सुरू असताना, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात मलिक रियाझविरोधात एक वेगळा खटलाही सुरू होता, ज्यात त्याला 460 अब्ज रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. इम्रानने अशी व्यवस्था करुन ठेवली होती की, रियाझची जप्त केलेली 50 अब्ज रुपयांची संपत्ती पाकिस्तानात येईल, पण दंड म्हणून ती सर्वोच्च न्यायालयाच्या खात्यात जमा केली जाईल. याचा अर्थ स्पष्ट होता की, 50 अब्ज रुपयांचा करार झाला होता, ज्यामध्ये रियाझचे पैसे आले होते, पण तो त्याचा दंड मानला गेला. हे प्रकरण इथपर्यंत असते, तर कदाचित मुद्दाच निर्माण झाला नसता. खरी कहाणी यानंतर घडली.

इम्रानने मलिक रियाझला दिलेल्या कथित फायद्याच्या बदल्यात मोठी जमीन स्वतःच्या आणि पत्नीच्या नावे करुन घेतली. या जमिनीवर अल कादिर युनिव्हर्सिटी ट्रस्ट बांधण्यात आले. अशाप्रकारे, देशासोबत विश्वासघात करुन मोठ्या प्रमाणात फायदा मिळवण्यात आला होता. याच प्रकरणात आता इम्रान खानला आज शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

4 प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले 
इम्रानवर शिक्षेची टांगती तलवार असलेला हा चौथा मोठा खटला होता. याआधी, गेल्या वर्षी जानेवारीमध्ये तोशाखाना प्रकरणात (सरकारी भेटवस्तू विकणे), सायफर प्रकरण (अमेरिकन राजदूताने पाठवलेली माहिती लीक करणे), इद्दत प्रकरण (बेकायदेशीरपणे विवाह) प्रकरणात इम्रान खानला दोषी ठरवण्यात आले होते. याशिवाय इम्रान खानवर इतर डझनभर खटले सुरू आहेत. ही सर्व प्रकरणे राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचे खान यांचे म्हणणे आहे. आता अल कादिर ट्रस्ट प्रकरणात आज सुनावण्यात आलेली 14 वर्षांची शिक्षा उच्च न्यायालयात किती काळ टिकेल, हे पाहणे महत्वाचे आहे.

Web Title: What is the Al Qadir Trust case, in which Imran Khan was sentenced to 14 years in prison?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.