दीर्घकाळच्या अंतराळ ‘कैदे’नंतर पुन्हा ‘पृथ्वीवासी’ होण्यासाठी काय करताहेत सुनीता विल्यम्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 12:37 IST2025-03-24T12:36:44+5:302025-03-24T12:37:14+5:30

जाणून घेऊया सुनीता आणि बुच नेमके काय करत आहेत.

what is Sunita Williams doing to become normal human being on earth again after a long time space | दीर्घकाळच्या अंतराळ ‘कैदे’नंतर पुन्हा ‘पृथ्वीवासी’ होण्यासाठी काय करताहेत सुनीता विल्यम्स?

दीर्घकाळच्या अंतराळ ‘कैदे’नंतर पुन्हा ‘पृथ्वीवासी’ होण्यासाठी काय करताहेत सुनीता विल्यम्स?

वॉशिंग्टन: नऊ महिने १४ दिवसांच्या अंतराळ ‘कैदे’नंतर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना पुन्हा पृथ्वीवरील सामान्य जीवन जगण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. दीर्घकाळ अंतराळात राहिल्यामुळे त्यांच्यावर शारीरिक परिणाम तर झाला आहेच; पण हार्मोनल आणि मानसिक बदलांनाही ते सामोरे गेले आहेत. हाडे आणि स्नायू कमकुवत झाल्यामुळे सध्या ते नीट चालू-फिरू शकत नाहीत. त्यांना संक्रमण होण्याची भीती आहे. त्यामुळे पुन्हा सामान्य होण्यासाठी त्यांच्याकडून अनेक प्रकारचे व्यायाम करवून घेतले जात आहेत आणि आहारावर विशेष लक्ष दिले जात आहे. चला तर जाणून घेऊया सुनीता आणि बुच नेमके काय करत आहेत. (वृत्तसंस्था)

आतड्यांच्या आरोग्यासाठी?

अंतराळात शरीरातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या घटते. पृथ्वीवर परतल्यानंतर आतड्यांचे संतुलन आणि त्यांची गतिशीलता वाढवण्यासाठी अधिक फायबर असलेले अन्न आणि तरल पदार्थांचे सेवन केले जाते.

स्नायू आणि हाडांच्या मजबुतीसाठी... 

अंतराळात हाडांचा ठिसूळपणा दर महिन्याला एक ते दोन टक्क्यांनी वाढत जातो. त्यामुळे पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना फ्रॅक्चरची भीती असते. यामुळे त्यांना आधार घेऊन ट्रेडमिलवर हळूहळू चालण्याचा व्यायाम करावा लागतो, तसेच कॅल्शिअम आणि विटामिन डी सप्लिमेंट दिले जातात. त्याचप्रमाणे हायड्रोथेरपी (जल आधारित व्यायाम) करावे लागतात.

हृदयाच्या मजबुतीसाठी?

  • अंतराळात गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे शरीराला रक्ताचा पुरवठा करण्यासाठी हृदयाला अधिक पंपिंग करावे लागते. त्यामुळे हृदय हळूहळू कमजोर होत जाते. 
  • हृदयाच्या मजबुतीसाठी हळूहळू सायकलिंग, रोइंग आणि पोहण्यासारखे व्यायाम करवून घेतले जातात. सोबतच  टिल्ट टेबल ट्रेनिंग दिले जाते.


मेंदू पूर्ववत होण्यासाठी...

  • अंतराळात मेंदूतील निरंतरतेची भावना कमी होते. त्यामुळे असंतुलन, चक्कर येणे, प्रतिक्रियेस विलंब अशा प्रकारच्या समस्या येतात.
  • त्यावर उपाय म्हणून अस्थिर मार्गांवर चालणे, स्थिरता चेंडूंचा उपयोग करणे आणि नेत्र ट्रेकिंग अभ्यास केला जातो. सोबतच निरो मेस्क्युलर थेरेपी दिली जाते.


डोळ्यांसाठी काय?

  • अंतराळात डोळ्यांतील पेशींवर दबाव वाढतो.त्यामुळे दृष्टी कमकुवत होते आणि एका ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येतात.  
  • यावर उपाय म्हणून डोळ्यांच्या नियमित व्यायामासोबतच आहारात मिठाचे प्रमाण कमी करणे आणि तरल पदार्थ अधिक प्रमाणात घेणे यावर भर.


कधी जाणार घरी?
सुनीता नासाच्या ह्युस्टन (टेक्सास) येथील जॉन्सन स्पेस सेंटर येथे आहेत. तेथे त्यांना हे विविध व्यायाम आणि आहार देण्यात येत आहे. ४५ दिवस त्यांचा हा पुनर्वसन कार्यक्रम चालेल. त्यानंतर त्यांना घरी पाठविले जाईल.

Web Title: what is Sunita Williams doing to become normal human being on earth again after a long time space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.