टोकियो - जपानमध्ये कृषीमंत्री ताकु एतो यांना तांदळाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. बुधवारी ताकु एतो त्यांच्या मंत्रिपदावरून पायउतार झाले. तांदळावर एतो यांनी केलेल्या विधानामुळे विरोधक आणि सर्वसामान्य जनतेकडून त्यांना टीकेचा भडिमार सहन करावा लागला. ताकु एतो यांच्या वादग्रस्त विधानामुळे पंतप्रधान शिगेरु इशिबा यांच्या सरकारची कोंडी झाली. देशात वाढलेल्या महागाईमुळे जनता त्रस्त आहे अशावेळी कृषिमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.
कृषीमंत्री ताकु एतो यांनी रविवारी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या एका सेमिनारमध्ये वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले की, मला कधी तांदूळ विकत घ्यावे लागत नाही, कारण माझे समर्थक गिफ्ट म्हणून ते देत असतात असं त्यांनी म्हटलं. ताकु एतो यांच्या या विधानामुळे विरोधक आक्रमक झाले. लोकांमध्येही आक्रोश पसरला. त्यांच्या राजीनाम्याची मागणी वाढू लागली त्यानंतर एतो यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. बुधवारी एतो यांनी पंतप्रधानांकडे राजीनामा सुपूर्द केला जो त्यांनी स्वीकारला आहे.
पंतप्रधान कार्यालयात राजीनामा दिल्यानंतर ताकु एतो यांनी माध्यमांशी संवाद साधला. देशात ग्राहक तांदळाच्या वाढत्या किंमतीमुळे त्रस्त आहेत त्यात मी हे चुकीचे विधान केले. सरकारला तांदळाच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी पाऊले उचलणे गरजेचे आहे. त्यात मी या प्रमुख पदावर राहणे योग्य नाही. मी लोकांची माफी मागतो आणि माझे विधान मागे घेतो. मी तांदूळ खरेदी करून खातो, भेट मिळालेल्या तांदळावर अवलंबून नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.
जपानमधील सरकारचं नेतृत्व सध्या अल्पमतात आहे. जुलैमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकीआधी हे विधान पक्षाला परवडणारे नाही. त्यातून पक्षाला फटका बसला पंतप्रधान शिगेरू इशिबा यांना पद सोडावे लागू शकते. ताकु एतो यांच्या विधानामुळे मतदारांमध्ये नाराजी आहे. जपानमध्ये तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्याला शिंतो धर्मात देवतांना अभिषेक घालण्यासाठी वापरले जाते. जपानी जेवणात तांदळाची महत्ताची भूमिका आहे. जपानची ग्रामीण अर्थव्यवस्था तांदळावर निर्भर आहे. त्यामुळे तांदूळ उत्पादनात घट आणि महागाई हा तिथे संवेदनाचा मुद्दा आहे. मागील काही महिन्यांपासून जपानमध्ये तांदळाच्या किंमती वाढल्यामुळे जनता नाराज आहे.