सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 07:32 IST2025-12-31T07:31:34+5:302025-12-31T07:32:14+5:30
शिनजियांग प्रांतात 'ही' गाणी ऐकणे, डाउनलोड करणे किंवा सोशल मीडियावर शेअर करणे आता अधिकृतपणे गुन्हा घोषित करण्यात आला आहे.

सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
जगातील महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चीनने आपल्याच देशातील अल्पसंख्याक उईगर मुस्लिम समुदायाची गळचेपी करण्यासाठी आता टोकाचे पाऊल उचलले आहे. शिनजियांग प्रांतात उईगर लोकगीते ऐकणे, डाउनलोड करणे किंवा सोशल मीडियावर शेअर करणे आता अधिकृतपणे गुन्हा घोषित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, वर्षानुवर्षे लग्नसमारंभात गायले जाणारे 'बेश पेडे'सारखे पारंपरिक लोकगीतही आता चिनी प्रशासनाच्या रडारवर आले असून, या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना थेट तुरुंगवास आणि मोठ्या दंडाची शिक्षा सुनावली जात आहे.
काय आहे 'बेश पेडे'चा वाद?
'बेश पेडे' हे एक भावनिक लोकगीत आहे. यात एक तरुण आपल्या प्रेमाबद्दल आणि सुखी आयुष्याबद्दल ईश्वराकडे प्रार्थना करतो. या गाण्यात कोठेही हिंसा किंवा कट्टरतेचा लवलेशही नाही. मात्र, तरीही चिनी प्रशासनाने याला संशयास्पद ठरवून त्यावर बंदी घातली आहे. नॉर्वेमधील 'उईगर हेल्प' या संस्थेला मिळालेल्या माहितीनुसार, काशगर शहरात पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
धार्मिक ओळख पुसण्याचा घाट
केवळ गाणीच नव्हे, तर उईगर समुदायाची धार्मिक ओळख पूर्णपणे पुसून टाकण्यासाठी चीनने कंबर कसली आहे. आता या भागात कोणालाही 'अस्सलामु अलैकुम' म्हणून अभिवादन करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याऐवजी 'कम्युनिस्ट पार्टी तुमची रक्षा करो' असे बोलण्याची सक्ती केली जात आहे. ज्यांनी ही गाणी मोबाईलमध्ये ठेवली आहेत किंवा जे जुन्या परंपरेचे पालन करत आहेत, त्यांना तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
१० लाख लोक कोठडीत?
गेल्या काही वर्षांत चीनने शिनजियांगमध्ये दडपशाहीचा कळस गाठला आहे. मानवाधिकार संघटनांच्या अहवालानुसार, २०१७ पासून सुमारे १० लाख उईगर आणि इतर मुस्लिम अल्पसंख्याकांना कोणत्याही खटल्याशिवाय छावण्यांमध्ये डांबून ठेवण्यात आले आहे. २०२२ मध्ये संयुक्त राष्ट्रानेही चीनच्या या कृत्याला 'मानवतेच्या विरोधातील गुन्हा' असे संबोधले होते.
चीनचा अजब दावा
एकीकडे जगभरातून या कारवाईचा निषेध होत असताना, चीनने मात्र आपले हात झटकले आहेत. "हे निर्बंध केवळ दहशतवाद आणि धार्मिक उग्रवाद रोखण्यासाठी आहेत," असा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.