युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 10:51 IST2025-09-21T10:50:52+5:302025-09-21T10:51:35+5:30

रशियन ड्रोन्स आणि जेट्सनी युरोपीय देशांच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याने नाटो सदस्य राष्ट्रांची चिंता वाढली आहे.

War at the doorstep of Europe! Russian drones intrude into the territory of NATO countries, has the risk of World War III increased? | युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

युक्रेन-रशियायुद्धाला तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला असताना, आता हे युद्ध फक्त त्या दोन देशांपुरते मर्यादित राहिले नसून संपूर्ण युरोपमध्ये पसरण्याची शक्यता वाढली आहे. गेल्या काही दिवसांत रशियन ड्रोन्स आणि जेट्सनी युरोपीय देशांच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याने नाटो सदस्य राष्ट्रांची चिंता वाढली आहे.

काय आहे प्रकरण?

स्काय न्यूजच्या माहितीनुसार, पोलंडच्या आकाशात रशियन ड्रोनची घुसखोरी झाल्यानंतर, दोन ब्रिटिश लढाऊ विमानांनी पोलंडच्या सुरक्षेसाठी पहिले संरक्षण मिशन यशस्वी केले आहे. या ऑपरेशनच्या आधी, ब्रिटनचे संरक्षण सचिव जॉन हीली यांनी म्हटले होते की, "जेव्हा आम्हाला धोका असतो, तेव्हा आम्ही एकत्र येऊन उत्तर देतो." या वक्तव्याचा अर्थ स्पष्ट आहे की, युरोपीय देश एकमेकांच्या सुरक्षेसाठी 'नाटो मोड' ऑन करत आहेत. नाटोच्या नियमांनुसार, एका देशावर झालेला हल्ला हा सर्व नाटो सदस्य राष्ट्रांवर हल्ला मानला जातो.

नाटोच्या 'ऑपरेशन ईस्टर्न सेंट्री'ची सुरुवात!

ब्रिटिश फायटर जेटने नाटोच्या 'ऑपरेशन ईस्टर्न सेंट्री' अंतर्गत ही उड्डाणे घेतली आहेत. हे ऑपरेशन पोलंडने एका रशियन ड्रोनला पाडल्यानंतर युरोपच्या पूर्व भागाला अधिक मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.

रशियन ड्रोनची घुसखोरी इथेच थांबली नाही. काही दिवसांनंतर रोमानियाच्या हवाई हद्दीतही एक रशियन ड्रोन आढळून आले. तसेच, शुक्रवारी तीन रशियन जेट्स १२ मिनिटांपर्यंत इस्टोनियाच्या हवाई हद्दीत उडत होते.

पुढील धोका आणि तयारी

नाटो देशांच्या हवाई हद्दीत वारंवार होणारी ही घुसखोरी रशियाच्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धाच्या संभाव्य विस्ताराची भीती वाढवत आहे. रशिया नाटोच्या प्रतिक्रियेची चाचणी घेण्यासाठी जाणूनबुजून असे करत असल्याचे मानले जात आहे.

या घटनेनंतर, पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी इशारा दिला आहे की, त्यांचे राष्ट्र दुसऱ्या महायुद्धानंतरच्या सर्वात मोठ्या युद्धाच्या धोक्यात आहे. तर, ब्रिटनने पोलंडला अतिरिक्त हवाई सुरक्षा पुरवण्याची घोषणा केली आहे. युक्रेन-रशिया युद्ध आता युरोपच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे आणि तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: War at the doorstep of Europe! Russian drones intrude into the territory of NATO countries, has the risk of World War III increased?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.