रशियन इतिहासात आदराचे स्थान; पुतिन यांच्या नावातील 'व्लादिमीर'चा नेमका अर्थ काय? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:48 IST2025-12-05T13:48:18+5:302025-12-05T13:48:55+5:30
व्लादिमीर पुतिन दीर्घ काळापासून रशियाचे नेतृत्व करत आहेत.

रशियन इतिहासात आदराचे स्थान; पुतिन यांच्या नावातील 'व्लादिमीर'चा नेमका अर्थ काय? जाणून घ्या
Vladimir Putin India:रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे जागतिक पातळीवरील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाइतकाच त्यांच्या नावाचा अर्थ आणि ऐतिहासिक संदर्भदेखील विशेष आहेत. त्यांच्या नावातील 'व्लादिमीर' या शब्दाचा अर्थ आणि त्यामागचा ऐतिहासिक संदर्भ अनेकांना माहित नाही. स्लाविक संस्कृतीत 'व्लादिमीर' हे सामान्य नाव नाही, तर शतकानुशतके राजसत्ता, नेतृत्व आणि सामर्थ्याचे प्रतीक राहिले आहे. रशियन इतिहासात या नावाचे विशेष महत्त्व आहे.
'व्लादिमीर'चा नेमका अर्थ काय?
'व्लादिमीर' या नावाचा अर्थ “जगाचा शासक”, “महान शासक” किंवा “शांतिपूर्ण शासक” असा होतो. हे नाव दोन प्राचीन स्लाविक शब्दांच्या संयोगातून तयार झाले आहे.
व्लादेती : शासन करणे
मीर : शांती किंवा विश्व
या अर्थामुळे हे नाव शतकानुशतके सत्तेचे, शक्तीचे आणि नेतृत्वाचे प्रतीक मानले गेले आहे.
रशियन इतिहासाशी असलेली नाळ
'व्लादिमीर' हे नाव रशियन राजघराण्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय राहिले आहे. 988 मध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारून कीवन रुसचे रुपांतर करणारे 'व्लादिमीर द ग्रेट' हे या नावाचे ऐतिहासिक उदाहरण आहे. त्यांच्या निर्णयामुळे आजच्या रशिया, यूक्रेन आणि बेलारूसच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीची भक्कम पायाभरणी झाली. त्यामुळेच या नावाला रशियन सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेत आदराचे स्थान आहे.
पुतिन यांना शोभणारे नाव...
'व्लादिमीर' या शब्दाचा अर्थच शासन करणारा असा आहे. त्यामुळे दीर्घ काळापासून राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून रशियाचे नेतृत्व करणाऱ्या पुतिन यांना 'व्लादिमिर' हे नाव शोभते.