पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 18:48 IST2025-12-04T18:45:32+5:302025-12-04T18:48:28+5:30
Vladimir Putin India Visit : युक्रेन-रशिया युद्ध सुरू झाल्यानंतर पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा असल्याने, आंतरराष्ट्रीय भू-राजकीय स्तरावर या २३ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आपल्या दोन दिवसीय महत्त्वाच्या भारत दौऱ्यासाठी आज नवी दिल्लीत दाखल होत आहेत. त्यांचे विमान भारतीय हवाई क्षेत्रात पोहोचले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः पालम विमानतळावर त्यांचे स्वागत करणार आहेत. युक्रेन-रशिया युद्ध सुरू झाल्यानंतर पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा असल्याने, आंतरराष्ट्रीय भू-राजकीय स्तरावर या २३ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये केवळ पारंपारिक ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्यावरच नव्हे, तर नव्या क्षेत्रांमध्ये भागीदारी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. पुतिन यांच्यासोबत रशियाच्या आरोग्य, अर्थ आणि संरक्षण मंत्र्यांसह एक उच्च-स्तरीय शिष्टमंडळ भारतात आले आहे. पुतीन यांचे विमान भारतीय हद्दीत येताच रशियन लढाऊ विमाने माघारी फिरली आहेत.
आर्थिक संबंधांना नवी दिशा
या दौऱ्याचा मुख्य उद्देश आर्थिक संबंध मजबूत करणे हा आहे. सध्या भारताचा रशियासोबत असलेला व्यापार तुटीचा असल्याने, ही तूट कमी करण्यासाठी भारताकडून रशियाला होणारी निर्यात वाढवण्याचे मार्ग शोधले जात आहेत. फार्मास्युटिकल्स, ऑटोमोबाईल, कृषी उत्पादने आणि सागरी उत्पादनांच्या निर्यातीला मोठा वाव मिळणार आहे. यातून भारतीय उद्योगांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल, तसेच रोजगाराच्या संधीही वाढतील, अशी अपेक्षा आहे.
महत्त्वाचे करार अपेक्षित
या शिखर परिषदेत शिपिंग, आरोग्य सेवा, खते (फर्टिलायझर) आणि कनेक्टिव्हिटी यांसारख्या क्षेत्रांमध्ये अनेक महत्त्वाचे करार आणि सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी आज रशियाच्या आरोग्य मंत्र्यांशी भेट घेऊन आरोग्य क्षेत्रात भागीदारी वाढवण्यावर सहमती दर्शवली.
संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी या भेटीला जागतिक बदलांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची म्हटले आहे. एकंदरीत, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा हा दौरा भारत-रशिया संबंधांना केवळ सामरिक नव्हे, तर आर्थिक आणि वैज्ञानिक स्तरावरही एका नव्या उंचीवर नेणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.