रशियाला मोठा धक्का! मॉस्कोमध्ये लष्करी गुप्तचर विभागाच्या उपप्रमुखावर गोळीबार; हॉस्पिटलमध्ये मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 14:42 IST2026-02-06T14:40:44+5:302026-02-06T14:42:13+5:30
Vladimir Alekseyev shot Moscow : रशियाच्या GRU चे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल व्लादिमीर अलेक्सेव्ह यांच्यावर मॉस्कोमध्ये जीवघेणा हल्ला झाला आहे. गोळीबारात ते गंभीर जखमी झाले असून रशियात हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी.

रशियाला मोठा धक्का! मॉस्कोमध्ये लष्करी गुप्तचर विभागाच्या उपप्रमुखावर गोळीबार; हॉस्पिटलमध्ये मृत्यू
मॉस्को: रशियाची राजधानी मॉस्कोमधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. रशियन लष्करी गुप्तचर संस्था (GRU) चे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल व्लादिमीर अलेक्सेव्ह यांच्यावर एका निवासी इमारतीबाहेर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. अज्ञात हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात अलेक्सेव्ह गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.
अलेक्सेव्ह हे मॉस्कोमधील एका निवासी संकुलाजवळ असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. हल्लेखोराने त्यांना लक्ष्य करून अनेक राउंड फायरिंग केली, ज्यामध्ये काही गोळ्या त्यांच्या पाठीत लागल्या आहेत. हल्ल्यानंतर परिसरात मोठी नाकाबंदी करण्यात आली असून हल्लेखोर फरार झाला आहे. रशियन सुरक्षा यंत्रणांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
व्लादिमीर अलेक्सेव्ह हे रशियाच्या लष्करी गुप्तचर विभागातील (GRU) दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली अधिकारी मानले जातात. युक्रेन युद्धाच्या रणनीतीमध्ये आणि गुप्तचर मोहिमांमध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे, २०२३ मध्ये झालेल्या 'वॅग्नर ग्रुप'च्या बंडादरम्यान जेनी प्रिगोझिन यांच्याशी संवाद साधणाऱ्या प्रमुख रशियन अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होता.
तणाव वाढण्याची शक्यता
रशियाच्या अंतर्गत भागात हाय-प्रोफाईल लष्करी अधिकाऱ्यावर झालेला हा हल्ला रशियन सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. यापूर्वीही काही रशियन लष्करी अधिकाऱ्यांवर असे हल्ले झाले असून, रशियाने यासाठी युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणांना जबाबदार धरले आहे. या घटनेमुळे रशिया आणि युक्रेनमधील तणाव अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.